कानपूर आयआयटीतील प्राध्यापकांचे मत
एका १४ वर्षांच्या विद्यार्थ्यांने कोटय़ात आत्महत्या केल्याने विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. मानसिक ताणातून वर्षभरात ३० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विद्यार्थ्यांवर येणारे विविधांगी ताण केवळ कोटा किंवा आयआयटीमध्येच नाहीत तर नागपूरसारख्या उपराजधानीच्या ठिकाणीही आहेत. मात्र, कोटा आणि आयआयटीमधील शिक्षणाचे वातावरण भिन्न असले तरी विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण ही सार्वत्रिक समस्या असल्याचे कानपूर आयआयटीतील प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
नागपुरातील कोटय़ाच्या खासगी शिकवणी वर्गासाठी विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ांतील विद्यार्थी प्रवेश घेतात. आयआयटी-जेईई हे त्यांचे मुख्य लक्ष्य असते. खासगी शिकवणीला प्रवेश घेतला की थेट आयआयटी, एनआयटी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्रवेश मिळतो, हे गुणोत्तर शिकवणी वर्गाचे संचालक महाविद्यालयीन विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या मनावर बिंबवतात. पालकही लाखो रुपयांचे शिकवणी वर्ग विद्यार्थ्यांला लावतात. डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे, त्यासाठी लाखोंचा खर्च केला आहे, त्यातून विद्यार्थ्यांवर एक सुप्त तणाव असतो. शिवाय महाविद्यालय आणि १६ ते १८ तास अभ्यासात घालवून बाकी जगाशी संबंध तोडावा लागल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन ते मागे पडू लागतात. त्या वातावरणाशी तडजोड करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार डोकावतात. मुलांना कौटुंबिक, शैक्षणिक वातावरणाचा अभाव, मुलींना घरातूनच शिक्षणासाठी होणारा अटकाव, शिक्षण घेता न येणे वा रागवल्यावरही आत्महत्या केल्याची प्रकरणे यापूर्वी नागपुरात घडलेली आहेत.
मुलांवर आईवडिलांच्या अपेक्षांचे ओझे, अभ्यासाचा ताण असतो. मानसिक ताण कसा नियंत्रित करायचा यावर घरातूनच मार्गदर्शन मिळाले तर तणावग्रस्त वातावरणात मुले तगतात. अन्यथा ते आत्महत्येचा प्रयत्न करतात. आयआयटीत नवीन येणाऱ्या मुलांचे समुपदेशन योग्य पद्धतीने केले जाते. आठ मुलांच्या मागे एका प्राध्यापकाला सल्लागार किंवा समुपदेशक म्हणून नेमले जाते. त्यात अधुनमधून भेटायचे, मुलांना बोलवायचे. यातून मुलांचा कल चटकन लक्षात येतो. याशिवाय मुलांसाठी समुपदेशन केंद्रही असते. त्यांना इतर मुलांकडून, आईवडिलांकडून, प्राध्यापकांकडून येणाऱ्या समस्या ते मांडू शकतात. मानसोपचार तज्ज्ञांचीही विद्यार्थ्यांसाटी त्याठिकाणी सोय केली जाते.