सलग दुसऱ्याही दिवशी ग्राहकांच्या रांगा

केंद्र सरकारने चलनातील ५०० व१००० रुपयांच्या नोटा बाद केल्याची घोषणा करताना पर्यायी व्यवस्थेपर्यंत या नोटा पेट्रोलपंपांवर स्वीकारल्या जातील, असे जाहीर केले असतानाही केवळ चिल्लर घेण्यासाठी पेट्रोलपंपावर ग्राहकांनी रांगा लावल्याने शहरातील बहुतांश ठिकाणी वादावादीच्या घटना घडल्या. दरम्यान, एकाच वेळी इंधन खरेदीसाठी रांगा लागल्याने बुधवारी दुप्पटीने विक्री झाली.

पंपचालक पाचशेची नोट स्वीकारत होते, पण तेवढय़ाच रकमेचे पेट्रोल भरण्याचा आग्रह करीत होते. ग्राहकांचा त्याला विरोध होता, तर सुटे नसल्याने पर्याय नाही असे पंपचालकांचे म्हणणे होते. यातून वाद वाढत गेले. मंगळवारी मध्यरात्रीपासून पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्याने त्याचे पडसाद सर्वाधिक पेट्रोलपंपावरच उमटले. सकाळपासूनच सर्वच पंपावर रांगा दिसून आल्या. अनेक पेट्रोल भरण्याच्या निमित्ताने ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाहेर काढल्या. १०० रुपयाचे पेट्रोल भरायचे व चारशे परत मागायचे, तीनशेचे पेट्रोल मागायचे व हजारची नोट देऊन उर्वरित चिल्लर मागायची, एकाच वेळी सर्व ग्राहकांकडून होणाऱ्या मागणीमुळे पंपचालकांनी पाचशे व हजारची नोट देणाऱ्यांना तेवढय़ाच रकमेचे पेट्रोल भरण्याचा आग्रह धरला.

पेट्रोलपंप चालकांना सुरुवातीला हा प्रकार निदर्शनात न आल्याने त्यांनी त्यांच्याकडील सगळेच सुटे ग्राहकांना दिले, परंतु ते संपताच वाहनधारकांनी सुटे दिल्यावरच पेट्रोल देण्याचा प्रकार सुरू झाला.

मंगळवारी बहुतांश पेट्रोलपंप रात्री २ वाजेपर्यंत सुरू राहिले. सलग दुसऱ्या दिवशीही (बुधवार) सकाळपासून नागरिकांनी इंधन भरण्याकरिता पेट्रोलपंपांवर गर्दी केली. याहीवेळी ५०० व एक हजार रुपयांच्याच नोटा ग्राहक देत होते. सुटे नसल्याने पेट्रोलपंप चालक सुटे द्या वा जितक्याची नोट देत आहात, तेवढेच इंधन घेण्याचा आग्रह धरत असल्याने बऱ्याच ठिकाणी ग्राहकांसोबत पंपावरील कर्मचाऱ्यांचे वादही होत होते.

अचानक पेट्रोलची विक्री वाढल्याने गेल्या दोन दिवसांत दुप्पट इंधनाची विक्री झाल्याचे पंपचालक सांगत आहेत.

महावितरणच्या ग्राहकांना फटका

महावितरणकडूनही बुधवारी विविध बिल भरणा केंद्रांवर १००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात आल्या नाहीत. तेव्हा बऱ्याच केंद्रांवर ग्राहकांचे कर्मचाऱ्यांसोबत वाद झाले. त्यातच बुधवारी बिल भरण्याकरिता आधीच पैसे काढलेल्या नागरिकांना बुधवारी बिल भरणा केंद्राची शेवटची मुदत असल्याने व सुटे नसल्याने नाहक विलंब आकाराचा भरुदड स्वीकारावा लागला. या प्रकाराने पैसे असतानाही केंद्राने अचानक घेतलेल्या विचित्र निर्णयाने ग्राहकांनाच त्याचा फटका बसल्याचे बोलले जाते.

रेल्वे प्रवाशांनाही फटका

रेल्वे स्थानकावरही व्हेंडरकडून पाचशेच्या नोटा स्वीकारण्यात आल्या नाहीत. त्यामुळे खाद्यपदार्थ घेण्यासाठी आलेल्या प्रवाशांना त्याचा फटका बसला. नागपूर स्थानकाहून दररोज शेकडो प्रवाशी गाडय़ांची ये-जा होते. नागपुरात गाडी थांबल्यावर न्याहारीसाठी प्रवाशी व्हेंडरकडून खाद्यपदार्थ घेतात. पाण्याच्या बाटल्यांचीही विक्री होते. मात्र, मंगळवारी रात्रीपासून व्हेंडरनी मोठय़ा नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने अनेकांना उपाशीच पुढचा प्रवास करावा लागला, तर काहींना पैसे असूनही पाणी मिळाले नाही.

भाईंनाही पडली खोक्यांचीचिंता

लोकांकडून अवैधपणे वसूल केलेल्या पैशांचे करायचे काय? असा प्रश्न शहरातील कुख्यात गुंडांना पडला असून कोणाच्या नावावर व्यवहार दाखवायचे आणि आजवर खोका, पेटीने भरलेला पैसा पांढरा कसा करायचा, अशा चिंतेने शहरातील गुंडांना ग्रासले आहे. याशिवाय राजकीय पुढारी, बडय़ा व्यापाऱ्यांचा काळा पैसा इकडून तिकडे करणारे हवाला व्यापारी, क्रिकेट सट्टा चालविणाऱ्यांना ५०० व हजार रुपयांचा नोटांचा सर्वाधिक फटका बसला आहे.

१२ मे २०१६ ला नागपूर पोलिसांनी शहरातील दहा प्रतिष्ठानांवर छापा टाकून ‘डब्बा व्यापार’ उघडकीस आणला होता. मात्र, कायद्याच्या कचाटय़ात ही कारवाई अवैध ठरविण्यात आली, परंतु हा व्यापार कोटय़वधींमध्ये चालतो. या व्यापारातील सर्व पैसा हा काळा असतो. आता सरकारने ५०० आणि हजार रुपयांच्या नोटांचे चलन बंद केले. त्यामुळे डब्बा व्यापाऱ्यांकडे असलेला कोटय़वधींचा काळा पैसा पांढरा कसा करायचा, हा पेच निर्माण झाला आहे, तर याशिवाय राजकीय पुढारी, भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी आणि व्यापाऱ्यांच्या काळ्या पैशाची देवाणघेवाण करणाऱ्या हवाला व्यापाऱ्यांकडेही प्रचंड प्रमाणात पैसा असतो. सरकारच्या निर्णयामुळे हा पैसा आता ‘जैसे थे’ आहे. याशिवाय खंडणी वसुली, हप्ता वसुलीतून मिळविलेल्या पैशाचे करायचे काय, असा प्रश्न शहरातील कुख्यात गुंडांना सतावत असून गुंडांच्या कुटुंबांकडेही मोठय़ा प्रमाणात पैसा आहे. त्याची विल्हेवाट कशी लावायची आणि उपलब्ध असलेला पैसा पुन्हा चलनात कसा आणायचा, या चिंतेत सर्व प्रकारचे गुन्हेगार अडकले असून गुन्हेगारी वर्तुळात ‘खोका’ पांढरा कसा करायचा याचा विचार सुरू आहे.

देशातील सर्वात मोठा क्रिकेट सट्टा नागपुरात चालतो. क्रिकेट बुकींकडे हजारा कोटींची रोख असते. अशावेळी त्यांच्यासमोरही जुन्या नोटा बदलून नवीन नोटा कशा मिळवायच्या, असा पेच निर्माण झाला असून अनेकजण वकील, सीएचे मार्गदर्शन घेत असल्याची माहिती आहे. या सर्व व्यवहारांवर शहर पोलीसही लक्ष ठेवून आहेत, हे विशेष.