बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात येणारे कोणत्याही पक्षाचे नेते, मोठे पदाधिकारी शेगाव भेट चुकवत नाहीत. गजानन महाराज यांच्या समाधी स्थळी नतमस्तक होऊन काही ना काही साकडे घालतात, गाऱ्हाणे मांडतात. राज्याच्या प्रगतीची, सुख समृद्धीची शेतकऱ्यांच्या कल्याण व्हावे, अशी प्रार्थना करतात.या अलिखित नियमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील देखील अपवाद ठरले नाहीत. आज शनिवारी २६ जुलै रोजी दिवसभर खामगाव शहरात आयोजित राजकीय कार्यक्रमासाठी काल शुक्रवारी रात्री त्यांचे संतनगरी शेगावात आगमन झाले. शनिवारी शेगाव संस्थान मंदिरात ते दाखल झाले. श्री चरणी नतमस्तक झाल्यावर त्यांनी माध्यम प्रतिनिधीं समवेत संवाद साधला.
भविष्यात अजितदादा पवार मुख्यमंत्री व्हावेत असे, साकडे त्यांनी संत गजाननाचरणी घातले. राज्यातील महायुती सरकार मधील आठ मंत्र्यांना डच्चू मिळणार असा दावा एका वृत्तपत्रातून करण्यात आला. यावर विचारणा केली असता ते म्हणाले, याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही, अशी संक्षिप्त प्रतिक्रिया देत त्यांनी अधिक काही बोलण्याचे टाळले. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मधूनच लढवणार असा धोरणात्मक निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी स्थानिक राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.
अवैध सावकारी व सावकारांचे वाढते अत्याचार याबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अवैध सावकारांवर कठोर कारवाई करणार असा दावा ना. पाटील यांनी केला. श्री चरणी नतमस्तक यापूर्वी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेगावात श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रींच्या मंदिरात पोहोचल्यानंतर नामदार पाटील यांचे संस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखांचे त्यांनी उद्घाटन केले. खामगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी करण्यावर त्यांनी भर दिला.