बुलढाणा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना महाराष्ट्र संकटात आल्यावर मदतीसाठी धावून जायची. मात्र उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या वळचणीला गेल्यापासून अन आघाडीत गेल्यापासून मदतीची ही परंपराच बंद झाली आहे. किंबहुना त्यांना याचा विसरच पडला आहे.

विरोधकांचेही असेच असून त्यांनी सरकारवर नुसतीच टीका न करता शेतकऱ्यांना मदत करावी. काँग्रेसनेही मदतीचा हात द्यावा.  विरोधकांनी सरकारला फुकटचे सल्ले देणे बंद करावे असे टिकास्त्र शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी सोडले. मलकापूर मार्गावरील आपल्या मातोश्री संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपण २५ लाख रुपयांचे योगदान देत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. यासाठी आपण बुलढाण्यातील आपले दोन प्लॉट विकून ही रक्कम उभारल्याचा दावाही त्यांनी केला. या दाव्याची पुष्टी करण्यासाठी त्यांनी यावेळी  खरेदी विक्री खत आणि २५ लाखांची रक्कमही दाखवली. आज मंगळवारी, ३० सप्टेंबर  रोजी दुपारी ही पत्र परिषद आयोजित करण्यात आली होती.

यावेळी आमदार गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अतिवृष्टीच्या संकटात सापडलेला आहे. अर्ध्या अधिक  राज्यात भीषण ओल्या  दुष्काळाचे संकट आहे. मागील अनेक दशकात पडला नाही तेवढा यंदा पडला. यात शेतकऱ्याची नुसतेच पिके वाहून गेली नाही तर हजारो एकर जमीन खरडून गेली आहे. हे नुकसान कधीच न भरून निघणारे आहे. एवढी माती आणणार कुठून असा उदविग्न सवाल करून अनेक नेते पाहणीचे नुसतेच देखावे करीत आहे. आम्ही मदत केली तर प्रसिद्धी करून घेत असल्याचा आरोप करण्यात आला.

पर्यटन, फोटो सेशनचे आरोप न करता विरोधकांनी मदत निधी उभारावा, शेतकऱ्यांना मदत द्यावी, त्यांचे अश्रू पुसावे. ही टीकेची वेळ नाही तर शेतकऱ्याना मदतीची वेळ आहे. झालेले नुकसान भयावह आहे. यामुळेच आपण मुख्यमंत्री सहायता निधीत  २५ लाखांचे योगदान देत आहोत. बुलढाण्यातील सर्वे ४४ मधील दोन प्लॉट विकून ही रक्कम उभारली.

यामुळे ती टिपण्णी न करता राजकारणी, धार्मिक संस्थान, बिसिसीआय, बॉलिवूड, उद्योगपती, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी या संकटात मदतीचा हात पुढे करणे काळची  गरज आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी वाचला तर सगळे वाचतील याचे भान सगळ्यांनी ठेवणे काळाची गरज असल्याचे आमदार गायकवाड यावेळी म्हणाले.

कर्जमाफीसाठी योग्य वेळ

आज जगाचा पोशिंदा संकटात आहे. सरकारने पंचनामे पुर्ण करण्याचे आदेश दिले आहे. ती प्रक्रिया सुरू आहे. सरकारला शेतकर्‍यंाना मदत करायची आहे. कर्जमाफी करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मदत झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.  राज्याच्या आर्थिक संकटासाठी लाडकी बहीण योजना काही अंशी जवाबदार असल्याची कबुली आमदारांनी दिली. यावेळी युवासेनेचे मृत्युंजय गायकवाड, यासह शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, विजय अंभोरे, अजय बिल्लारी, श्रीकृष्ण शिंदे, गणेशसिंग राजपूत, अनुजा सावळे, जिजा राठोड उपस्थित होते.