वर्धा : संघटनात्मक कार्य करतांना तडजोडी आल्याच. आजची स्थिती उद्या पालटेल, सुगीचे दिवस येतील, न्याय मिळेलच अश्या आशेत पदाधिकारी पक्षकार्य करतात. मात्र अश्यावेळी मोठ्या नेत्याचे आशीर्वाद पण लागतातच. नव्हे तर पाठीवरून धीर देणारा हात फिरला, तरी पुरेसे ठरत असल्याचे कार्यकर्ते म्हणतात. पक्षकार्य हीच कसोटी असणाऱ्या भाजपमध्ये तर संघटनेत अशीच मंडळी पुढे आणल्या जात असल्याचा दावा होत असतो. त्याचेच हे एक उदाहरण म्हणता येईल.
माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे वातावरण होते. सर्वाधिक मतं त्यांनाच पडल्याची माहिती पुढे आली होती. पण माशी शिंकली, अन गफाट मागे पडले. नव्या दमाचे म्हणून संजय गाते जिल्हाध्यक्ष झाले. ही घडामोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कानी पोहचली. काही काळानंतर त्यांनी त्याची दखल घेतली. त्यांचे विश्वासू आमदार सुमित वानखेडे यांना त्यांनी सांगावा दिला. सुनिलला ( गफाट ) सोबत घेऊन भेटायला येशील. अखेर तो दिवस उघडला. आमदार वानखेडे हे गफाट यांना घेऊन मुंबईत वर्षा बंगल्यावर पोहचले. मुख्यमंत्री व हे दोघे अशी तिघांचीच बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी गफाट यांची प्रशंसा करीत म्हटले की तू जिल्हाध्यक्ष म्हणून खरंच चांगले काम केले. सर्वांना सांभाळून घेतले. असेच कार्य करीत रहा. काळजी करू नको. मी पाठीशी आहे. त्यावर गफाट यांनी पद असो, नसो. पक्षकार्य मनापासून सुरूच आहे. पुढेही जबाबदारी द्या. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ते काय करायचे मी बघतो.
ही भेट गफाट यांच्यासाठी अंगावर मोरपीस फिरवून गेली. मुख्यमंत्र्यांनी विशेष भेट देणे, हीच माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. आठवण ठेवून ते निरोप पाठवितात, यापेक्षा एका सामान्य कार्यकर्त्यांसाठी दुसरा काय गौरव असू शकतो, असे गफाट यांनी नमूद केले.अकस्मात अध्यक्षपदाची संधी लाभलेले गफाट सामान्य कुटुंबातील. आंजी या खेडेवजा गावात त्यांचे सायकल पंचर दुरुस्तीचे दुकान. पुढे भाजपशी जुळले. परिसरात संघटन वाढविले. सर्वांशी जुळवून घेत पदाधिकारी झाले. जि. प. सदस्यपद व पुढे सभापतीपद पक्षाने दिले. सर्वांना चालणारा म्हणून पक्षाने अध्यक्षपद सोपविले. मग मागे वळून पाहलेच नाही. ते म्हणतात दैनंदिन संपर्कासाठी आता आंजीत कार्यालय उघडणार. मुख्यमंत्र्यांनी धीर दिला. हेच पुरेसे.