समतानगर परिसरातील गुंडांनी दोन भावांचा तलवार आणि चाकूने निर्घृण खून केल्यानंतर वस्तीतील गुंडांविरुद्ध नागरिकांच्या मनात अनेक दिवसांपासून असलेला जनआक्रोश आज सोमवारी उफाळून आला. दोन भावांची हत्या करणाऱ्या गुंडांना जनतेच्या स्वाधीन करा, त्यांना जनता धडा शिकवेल, अशी मागणी करणाऱ्या हजारोंच्या संतप्त जमावाने जरीपटका पोलीस ठाण्यासमोर जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक केली. यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी जमावावर अनेकदा लाठीमार केला.
मूळचे मध्यप्रदेशातील असलेले इमरतलाल परिमल राणा (३५) आणि त्याचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून समतानगर परिसरातील अंबाटोली येथे राहतात. या ठिकाणी त्यांचे स्वत:चे घर आहे. त्याच्या घराच्या पाठीमागेच त्यांची बहीण आणि बाजूला भाऊ पूरणलाल परिमल राणा (३६) हा राहत असून संपूर्ण कुटुंब बांधकाम कंत्राटदाराकडे काम करतो. त्यांच्या घराच्या पाठीमागे कुख्यात प्रशांत अर्जुन चमके (४०), पत्नी गीता प्रशांत चमके, त्याची बहीण वंदना चमके (३५), जावई झनक मुन्नालाल तोमस्कर (४५), अंकुश झनक तोमस्कर (२२) आणि झनकचा जावई आदी राहतात. चमके आणि तोमस्कर कुटुंबीयांचा मूळ व्यवसाय हा अवैध दारूविक्रीचा आहे. याशिवाय प्रशांत हा संपूर्ण कुटुंबीयांसह वस्तीत दादागिरी करायचा. जुगार, सट्टा असे अवैध धंदे चालवायचा.
काल रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास राणा यांच्या घराच्या पाठीमागून जाणाऱ्या घाण पाण्याच्या नालीवरून त्याची बहीण आणि वंदना चमके हिच्यात वाद झाला. या वादातून दोन्ही कुटुंबीयांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि त्यांनी राणा कुटुंबीयांना मारहाण करण्यास सुरुवात केली. चमके आणि तोमस्कर कुटुंबातील सर्व सदस्यांनी राणा सदस्यांना मारहाण करीत असताना प्रशांत आणि इतर आरोपी घरात गेले आणि तलवारीने हल्ला चढविला. या हल्ल्यातून स्वत:चे प्राण वाचविण्यासाठी इमरत हा घरात शिरला. त्यावेळी आरोपींनी घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या बचावासाठी आलेल्या पूरणलाल याच्यावरही तलवारीने हल्ला केला. इमरतलाल हा जागीच ठार झाला. तर पूरणलाल याचा उपचारादरम्यान मेयो रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून सर्व आरोपींना अटक केली.
आरोपींच्या अवैध धद्यांना जरीपटका पोलिसांचेच अभय होते. आजवरच्या इतिहासात पोलीस समतानगर परिसरात केवळ आरोपींकडून हप्ता वसुलीसाठी यायचे. अनेक तक्रारीनंतरही आरोपींवर कारवाई होत नव्हती. त्यामुळे आरोपींची हिंमत वाढत गेली आणि ते वस्तीतील लोकांवर अत्याचार करू लागले. हा सर्व आक्रोश वस्तीतील नागरिकांच्या मनात खदखदत होता. राणा बंधूंच्या मृत्यूनंतर लोकांच्या मनात खदखदत असलेला हा आक्रोश आज उफाळून बाहेर आला. त्यामुळे आज सकाळपासूनच लोकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास संतप्त जमावाने पोलीस ठाण्यासमोर टायर जाळले आणि पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. त्यामुळे जमाव सैरभर झाला आणि जमाव वस्तीत परतला. पुन्हा २.३० वाजताच्या सुमारास जमाव वस्तीत परतला आणि त्यांनी आरोपींची घरे जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळीही पोलिसांवर दगडफेक झाली. पोलिसांनी पुन्हा जमावावर लाठीमार करून त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत जमाव आणि पोलिसांमध्ये झटापट उडत होती. पंधरा-पंधरा मिनिटांनी परिसरातील वातावरण बदलत होते. परिसरात कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पथकाचे नेतृत्व खुद्द परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त अभिनाशकुमार करीत होते. संध्याकाळी ५ वाजता राणा बंधूंवर नारा दहनघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर समतानगर परिसरात तणावपूर्ण शांतता होती. यात पोलिसांनी पंधरावर दंगलखोरांना ताब्यात घेतले.
भर रस्त्यांवर महिलांची छेडछाड
आरोपी प्रशांत चमके हा भरदिवसा आणि रस्त्यांवर वस्तीतील महिलांची छेड काढायचा. त्याचा डोळा इमरतलाल राणा याच्या
पत्नीवरही होता. परंतु इमरतची पत्नी त्याला भीक घालत नव्हती. त्यामुळे तो वेळोवेळी त्यांच्याशी भांडण करायचा. काल रविवारीही त्याने इमरतच्या पत्नीच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केला असता त्याने इमरतवर तलवारीने वार केला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

पोलीस उपायुक्तांची दादागिरी
पोलीस उपायुक्त अविनाशकुमार हे पथकाचे नेतृत्व करीत होते. त्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रचंड दबाव होता. कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी त्यांनी जमावावर अनेकदा लाठीमार केला. परंतु शांतता भंग करण्यामागे मरण पावलेल्या परिवारातील काही सदस्यांचा हात असावा, या संशयातून त्यांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबीयांनाच मारहाण केली. यावेळी त्यांनी महिलांचा हात पकडून घराबाहेर खेचण्याचा प्रयत्नही केला. त्यांच्या या दादागिरीविरुद्ध जमावामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.

महिला वृत्तछायाचित्रकाराशी असभ्य वर्तन
मृतकाच्या कुटुंबीयांना मारहाण करताना ‘लोकसत्ता’साठी काम करणाऱ्या वृत्तछायाचित्रकार मोनिका चतुर्वेदी यांनी काही छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अविनाशकुमार यांनी चतुर्वेदी यांच्या हातातील कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. चतुर्वेदी यांनी आपण वृत्तछायाचित्रकार असल्याची माहिती दिल्यानंतरही त्यांनी धक्काबुक्की केली. आयपीएस अधिकाऱ्यांचे एका वृत्तछायाचित्रकार महिलेसोबतच्या असभ्य वर्तनाबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. या घटनेनंतर वृत्तछायाचित्रकारांशी चर्चा करताना त्यांनी आपल्याला लग्नसमारंभ किंवा मयतीचे छायाचित्र काढणारे छायाचित्रकार असावेत असा भास झाला आणि हा प्रकार घडला, अशी कबुली दिली. चतुर्वेदी यांच्याशी अविनाशकुमार यांनी केलेली झटापट अनेक वृत्तछायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. नागपूर श्रमिक पत्रकार संघाने या घटनेचा निषेध केला आहे.