अकोला : भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्लीद्वारे विकसित कृषी संकल्प अभियान २९ मे ते १२ जून या कालावधीत देशभरात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अभियानामध्ये १ ते १.५ कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पथकाची निवड केली जाईल.
शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचण्यासाठी अभियानांतर्गत विशिष्ट उद्दिष्ट ठेऊन कार्य करण्यात येईल. खरीप हंगामातील पिकांसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, विविध सरकारी योजना व धोरणांविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे, पिकांची निवड, मृदा आरोग्य पत्रिकांची माहिती, नैसर्गिक शेती व संतुलित खतांचा वापर यावर मार्गदर्शन होणार आहे. या व्यतिरिक्त संशोधन केंद्रातील शिफारशीत तंत्रज्ञान शास्त्रज्ञांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवणार आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर हे विशेष अभियान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
अभियानासाठी भारतीय कृषी अनुसंधान परीषदेच्या अधिनिस्त राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील तसेच आत्मा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा चमू प्रत्येक जिल्ह्यातील गावांची निवड करून कृषी जागृकता रथाव्दारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
खरीप मोहिमेतून तंत्रज्ञान प्रसार; २० ते २५ हजार शेकऱ्यांना लाभ होणार
प्रत्येक जिल्ह्यात पथक तयार करण्यात आले आहेत. वाशीम जिल्ह्यात दोन चमू असून प्रत्येक चमू दिवसातून तीन बैठका सकाळी ८, १० वाजता व संध्याकाळी ६ वाजता दररोज एका तालुक्यातील तीन गावामध्ये कृषी जागृकता रथाद्वारे मार्गदर्शन शिबीर घेणार आहेत. या प्रकारे प्रत्येक तालुक्यातील पंधरा गावांची निवड करून जिल्ह्यातील नमुद ९० ते १२० गावांमध्ये किमान २० ते २५ हजार शेकऱ्यांनी खरीप मोहिमेतून तंत्रज्ञान प्रसार होणार आहे.
खरीप मोहिम २०२५ साठी गावांची यादी, गावनिहाय वेळापत्रक व संबधित नोडल अधिकारी जाहीर करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राच्या संकेत स्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गावस्तरावर शेतकऱ्यांच्या अधिक सहभागासाठी सरपंच, कृषी सखी, पोलीस पाटिल व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विकसित कृषी संकल्प अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे यांनी केले.