वेगवेगळ्या अपघातांत १ ठार, ३७ जखमी
धुळवडीला मद्य प्राशन करून वाहन चालवू नका, असे आवाहन आणि जनजागृती करण्यात आल्यानंतर शहरातील विविध भागात १२३३ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली. २०५ पेक्षा अधिक अपघात, हाणामारी, रंगाने संसर्ग आणि अति मद्य प्राशन करणाऱ्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. शहरातील विविध भागात झालेल्या अपघातांमध्ये १ जणाचा मृत्यू झाला तर ३७ जण जखमी झाले. शहर व जिल्ह्य़ात होळी व धूलिवंदन पारंपरिक पद्धतीने साजरा होत असताना गुरुवारचा दिवस अतिउत्साहामुळे दु:खदायी ठरला.
दरवर्षी मद्य प्राशन करून वाहन चालवताना होणारे अपघाताचे प्रमाण बघता शहरातील विविध भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच धूलिवंदनाच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात तळीरामांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरवर्षी होळी आणि धुळवडीच्या दिवशी होणारे अपघात, हाणामारी, पोलिसांशी वादावादीचे प्रकार पाहता यावेळी शहरातील विविध भागात होळीच्या दिवशी नाकाबंदी करून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू करून मद्य घेऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. गुरुवारी धुळवडीच्या दिवशी सकाळपासून पोलिसांनी कारवाई सुरू केली. दिवसभरात १२५५ तळीरामांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. पूर्व नागपुरात ३६२, पश्चिम नागपुरात १३९, उत्तर नागपुरात १८४, दक्षिण नागपुरात २६७, इंदोरा भागात २१४, एमआयडीसी भागात ६७ तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्याची पहिलीच वेळ असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे. शहरातील अनेक भागात मद्य घेऊन वाहन चालवणाऱ्यांशी पोलिसांशी वादावादी झाली आहे. चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त असताना शहरातील काही भागात तरुणाच्या कसरतीने धुळवडीला एक थरार प्राप्त झाला अशा युवकांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांची वाहने जप्त केली. मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू असताना ज्या वाहन चालकांनी हेल्मेट घातले नाही, अशाही ११०२ वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला. सदर पोलीस ठाण्यांतर्गत खलाशी लाईन भागात शिवमंदिर परिसरात नेंद्रकुमार टोटलवार आणि संजय खरे यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात मद्याचा साठा जप्त केला. समतानगर परिसरात अंकुश तोमस्कर अवैधपणे बनावट मद्याची विक्री करीत असताना त्याच्यावर गुन्हे शाखेने कारवाई केली. तोमस्कर याच्या मद्यासोबत शस्त्रसाठा सापडला असून तो सुद्धा जप्त करण्यात आला आहे. शिवाय शहरातील विविध भागात जुगार अड्डय़ावर कारवाई करून आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मुद्येमाल जप्त करण्यात आला. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मद्याचे अतिसेवन, अपघात आणि हाणामारीच्या २०७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यात २७ लोकांनी अति मद्य प्राशन केले, तर १४१ हे हाणामारी आणि अपघातात जखमी झाले आहेत. ३७ लोक अपघातात जखमी झाले आहे. गुरुवारी सकाळपासून मेडिकल रुग्णालयात वेगवेगळ्या रंगाचे इन्फेक्शन झालेल्या ११ रुग्णांवर तर नेत्र विभागात ५ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यात एका रुग्णाच्या डोळ्याला गंभीर जखम झाल्याचे सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2016 रोजी प्रकाशित
धुलिवंदनाला बाराशेपेक्षा अधिक तळीरामांना अटक
दिवसभरात १२५५ तळीरामांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-03-2016 at 02:33 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 1200 drunkers arrested on holi festival