’ रेडिओलॉजिस्टच्या संपामुळे रुग्णांचे हाल
’ रुग्णालयांत तपासणीकरिता धावाधाव
शासनाकडून केंद्राच्या ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याचा आधार घेत लहान- सहान कारणावरूनही रेडिओलॉजिस्टवर कारवाई केली जात आहे. त्यावर संतप्त होऊन मंगळवारी महाराष्ट्र रेडिओलॉजिकल आणि इमेिजग असोसिएशनच्या बॅनरखाली राज्यव्यापी संप करण्यात आला. त्यात नागपूरच्या शंभरावर क्ष किरण आणि सोनोग्राफी केंद्रांनी सहभाग घेतल्याने रुग्णांना एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफीसह विविध तपासणीकरिता खासगी वा शासकीय रुग्णालयात धाव घ्यावी लागली. त्यामुळे गंभीर रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
उपराजधानीत सुमारे १०० तर विदर्भात २५० च्या जवळपास क्ष किरण व सोनोग्राफी केंद्रे अस्तित्वात आहेत. या केंद्रांमध्ये लहान सहान कागदोपत्रातील दोष बघूनही केंद्रांवर कारवाई केली जाते. नागपूर जिल्ह्य़ातील या केंद्रात गंभीर गटातील अपघाताच्या रुग्णांपासून तर इतर रुग्ण व गरोदर मातांच्या सोनोग्राफीपासून एमआरआय, सिटी स्कॅन, क्ष किरण तपासणी केली जाते. ही संख्या हजारोंच्या घरात असते. परंतु एक लहानसी कागदोपत्री चूक बघूनही केंद्रावर कारवाई केली जाते. त्यामुळे रेडिओलॉजिस्टचा मानसिक छळ होत असल्याचा आरोप करीत मंगळवारी शहरातील सगळी खासगी क्ष किरण व सोनोग्राफी तपासणी केंद्रे बंद ठेवली.
गंभीर रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून शासकीय व खासगी रुग्णालयातील तपासणी केंद्रांकडून संपाला समर्थन घेत त्यांना तपासणीची सूट दिली होती. त्यामुळे मंगळवारी खासगी केंद्रात तपासणी बंद असल्याचे बघत रुग्ण येथून खासगी व शासकीय रुग्णालयात जात असल्याचे चित्र होते. गंभीर रुग्णांना तपासणीकरिता रुग्णालयांत चकरा माराव्या लागल्याने नागरिकांमध्ये संपाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात होता. शहरातील रेडिओलॉजिस्टची मंगळवारी दुपारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उत्तर अंबाझरी मार्गावर एक बैठक घेतली. त्यात केंद्र व राज्य शासनाच्या रेडिओलॉजिस्ट विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी काही नातेवाईकांनी काही क्ष किरण केंद्रांवर लपून- छपून रुग्णांच्या तपासण्या झाल्याची माहिती दिली.

केंद्राकडून स्त्री- पुरूष लिंग गुणोत्तराचा समतोल राखून स्त्री भृण हत्येला लगाम घालण्यासाठी ‘पीसीपीएनडीटी’ कायदा लागू करण्यात आला. मात्र, कायद्यात गर्भपातात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र तज्ज्ञांना झुकते माप तर रेडिओलॉजिस्ट आणि सोनॉलॉजिस्टना वेठीस धरले जात आहे. राज्यभरात अशा २०० डॉक्टरांना सोनोग्राफी केंद्रांना सील ठोकण्यात आले. याचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजिकल आणि इमेजिंग असोसिएशनने हा संप केला आहे. राज्य व केंद्र सरकारने तातडीने या विषयावर लक्ष घालून रेडिओलॉजिस्टना न्याय देण्याची गरज आहे. तसे न झाल्यास पुढे बेमुदत संपाकरिताही विचार केला जाईल.
– डॉ. सुरेश चांडक
राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र रेडिओलॉजिकल, इमेजिंग असोसिएशन.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोटय़वधींची उलाढाल ठप्प
उपराजधानीत मोठय़ा संख्येने खासगी व शासकीय क्ष किरण व सोनोग्राफी केंद्रे आहेत. सर्वाधिक तपासणी खासगी केंद्रांवर होते. तेव्हा रोज शहरात या क्षेत्रात कोटय़वधींची उलाढाल होते. एक दिवसाच्या संपामुळे हा व्यवहार ठप्प राहिल्याने शासनालाही करापोटी भेटणाऱ्या लक्षावधींचा फटका बसल्याचे बोलले जाते.