नागपूर : कोण म्हणतं फक्त ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांकडेच पर्यटकांना आकर्षित करण्याचं सामर्थ्य आहे. याच व्याघ्रप्रकल्पातील वाघांना करामती करता येतात. राज्यातील इतर अभयारण्य आणि त्यातील वाघांच्या करामतीसुद्धा तेवढ्याच दमदार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात पहाटे पहाटे एक-दोन नाही तर चक्क चार-चार वाघांनी अगदी शिस्तीत ‘मॉर्निंग वॉक’ करत पर्यटकांना मेजवानी दिली.

टिपेश्वर अभयारण्यातील माथानी प्रवेशद्वाराजवळील तिपाई ऍग्री टुरिझममध्ये मुक्कामी असलेले इब्राहिम यांनी हा व्हिडीओ चित्रित केला. तर वन्यजीवप्रेमी मीना जाधव यांनी तो ‘लोकसत्ता’ साठी उपलब्ध करून दिला. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात गेल्या काही वर्षात वाघांची संख्या वाढली आहे. अभयारण्याचे उत्तम व्यवस्थापन वाघांसाठी चांगला अधिवास तयार करत आहे. व्याघ्रदर्शनामुळे पर्यटकसुद्धा इकडे वळत आहेत. याच अभयारण्यातून ‘अवनी’ नामक एका देखण्या वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आले. तिच्यावर १४ माणसांचा बळी घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला.

हेही वाचा – गडचिरोली : ‘हनीट्रॅप’ प्रकरणात आक्षेपार्ह चित्रफीत पोलिसांच्या हाती, पत्रकाराच्या…

हेही वाचा – ‘सोशल मीडिया’वर आक्षेपार्ह मजकूर टाकणे सहायक फौजदाराला भोवले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्यक्षात या अभयारण्यात इतर वाघ होते आणि हल्ले त्यांच्याकडूनसुद्धा झाले होते. गावकऱ्यांची सतत जंगलात होणाऱ्या घुसखोरीमुळे ‘अवनी’ धास्तावली होती. कारण ती गर्भवती होती आणि तिच्या पोटातील बचड्यांना या माणसांपासून धोका असल्याची भीती तिला होती. बचड्यांना जन्म दिल्यानंतरही माणसांची तिच्या अधिवासातील घुसखोरी थांबली नाही आणि यातून तिने एक-दोन हल्ले केले. यानंतर तिला गोळी घालून ठार करण्यात आले. मात्र, या घटनेनंतर पर्यटकांनी या अभयारण्याकडे जवळजवळ पाठ फिरवली. आता अलीकडे वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच आता या अभयारण्याला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच आता ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या या चार वाघांचा व्हिडीओ समोर आल्याने टिपेश्वर अभयारण्याला लवकरच व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळण्याची शक्यता बळावली आहे.