अमरावती : राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने अधिकृत उमेदवारांची पाचवी यादी मंगळवारी जाहीर केली. यात मोर्शी मतदारसंघातून गिरीश कराळे यांना उमेदवारी घोषित करण्‍यात आली आहे. महाविकास आघाडीच्‍या उमेदवाराची घोषणा लांबल्‍याने इच्‍छुकांमध्‍ये अस्‍वस्‍थता निर्माण झाली होती. ती अनिश्चितता दूर झाली आहे. गिरीश कराळे हे जिल्‍हा काँग्रेस समितीचे उपाध्‍यक्ष आणि जिल्‍हा परिषदेचे माजी सभापती आहेत.

महाविकास आघाडीत मोर्शीच्‍या जागेवर राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दावा केला होता. काँग्रेसनेही ही जागा मिळावी, यासाठी प्रयत्‍न चालवले होते. अखेरीस शरद पवार यांच्‍या सुचनेनुसार या मतदारसंघात राष्‍ट्रवादीतर्फे गिरीश कराळे यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले. विशेष म्‍हणजे, गिरीश कराळे यांनी सोमवारीच राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा >>> वर्धा : पहिल्या टप्प्यात एमएलसी व राष्ट्रीय अध्यक्षांची हमी, तरीही केचे नॉट रिचेबल

मोर्शी मतदारसंघातून काँग्रेसतर्फे विक्रम ठाकरे उमेदवारीसाठी इच्‍छुक होते. राष्‍ट्रवादी शरद पवार गटातर्फे माजी मंत्री आणि श्री शिवाजी शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्‍या उमेदवारीची चर्चा होती, पण हर्षवर्धन देशमुख यानी आपण निवडणूक लढणार नाही, असे स्‍पष्‍ट केले होते.

राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे गेल्‍या ६ ऑक्‍टोबरला मुंबई येथील पक्ष कार्यालयात अमरावती जिल्‍ह्यातील आठ मतदारसंघातील इच्‍छुकांच्‍या मुलाखती पार पडल्‍या होत्‍या. सर्वाधिक स्‍पर्धा ही मोर्शीतूनच दिसून आली होती. यावेळी हर्षवर्धन देशमुख यांच्‍यासह गिरीश कराळे, अॅड. अमर देशमुख, विक्रम ठाकरे, राजेंद्र आंडे, डॉ. विजय देशमुख, डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, वृषाली विघे, मोहन मडघे, रवींद्र हिरूळकर, डॉ. मनोहर आंडे, सचिन रिठे आदींनी मुलाखती दिल्‍या होत्‍या.

हेही वाचा >>> ‘…तर ‘नोटा’ला मतदान’ हलबा समाज भाजप, काँग्रेसवर नाराज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोर्शीच्‍या जागेवर महाविकास आघाडी आणि महायुतीत अखेरच्‍या क्षणी उमेदवार जाहीर करण्‍यात आले. महायुतीत या जागेवरून पेचप्रसंग कायम आहे. आमदार देवेंद्र भुयार यांना राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे, तर भाजपने चंदू उर्फ उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीतील दोन्‍ही पक्ष अडून बसल्‍याने आता या ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होण्‍याची शक्‍यता आहे. गेल्‍या निवडणुकीत स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढणारे देवेंद्र भुयार यांनी भाजपचे डॉ. अनिल बोंडे यांना धक्‍कादायक पराभव केला होता. स्‍वाभिमानी पक्षातून देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी झाल्‍यानंतर ते अजित पवार यांच्‍या गटात सहभागी झाले.