नागपूर : तापमानवाढीचा परिणाम उन्हाळी हंगामावर होत असल्याने उष्णतेच्या लाटांची संख्या वाढली आहे. मागील १२-१३ दशकात यावर्षीचा मार्च महिना देशातील सर्वाधिक उष्ण ठरला असून राज्यात यावर्षी देखील उष्णतेच्या लाटा अधिक राहतील, असा अंदाज हवामान खाते व अभ्यासकांनी दिला आहे. गेल्या पाच दशकांमध्ये राज्याची उपराजधानी नागपूर उष्णतेच्या लाटेत पहिल्या क्रमांकावर असून चंद्रपूर दुसऱ्या तर अमरावती तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये १९६९ ते २०१९ दरम्यान उन्हाळय़ात सर्वाधिक म्हणजे २४६ उष्णतेच्या लाटांची नोंद झाली. चंद्रपूर शहरात १७९ तर अमरावती शहरात १६९ उष्णतेच्या लाटांची नोंद आहे. नागपूर शहरात मार्च वगळता एप्रिल, मे, जून आणि जुलै महिन्यात मागच्या पाच दशकातील सर्वाधिक उष्णतेच्या लाटांची नोंद करण्यात आली. एप्रिलमध्ये ३७, मे महिन्यात १०७, जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी ५१ उष्णतेच्या लाटांची नोंद झाली. चंद्रपूर शहरात एप्रिलमध्ये १३, मे महिन्यात ९० तर जून आणि जुलैमध्ये ३८ उष्णतेच्या लाटांची नोंद झाली. नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीनंतर विदर्भातील इतरही शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेची नोंद झाली. यवतमाळमध्ये १६८, भंडारा १३२, गडचिरोली १३२, वर्धा १११, बुलढाणा ११० अशा गेल्या पाच दशकातील उष्णतेच्या लाटेच्या नोंदी आहेत. यावर्षी मात्र मार्च महिन्यातच उष्णतेच्या लाटेला सुरुवात झाली. एप्रिलमध्येही ती कायम राहील असा अंदाज आहे. मार्च महिन्यात यावर्षी चंद्रपूर शहराचे तापमान ४४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक गेले. एप्रिल महिन्यात अकोला शहरानेही ४४ अंश सेल्सिअस तापमान ओलांडले. यावर्षी मार्चमध्येच तापमानाचा वाढता कल पाहिल्यानंतर एप्रिलमध्ये कमाल आणि किमान तापमान वाढलेले राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. एप्रिल महिना देखील पूर्णपणे तापलेला राहील, असाही अंदाज आहे. एप्रिल महिन्यात वारे कोरडे असतात आणि काही दिवस दुपारच्या वेळी पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेकडून मध्यम ते तीव्र होतात. यामुळे उन्हाची झळ अधिक जाणवते. मार्च महिन्यात नागपूरचे तापमान ४२ अंश सेल्सिअसवर गेले तसेच ते एप्रिलमध्येही ४१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक जाईल असा अंदाज आहे. २०१७ साली नागपूर शहरात एप्रिल महिन्यातील गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. १९ एप्रिल २०१७ ला ४५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. त्यामुळे यंदाची तापमान वाढ पाहता हा विक्रम उपराजधानी मोडीत काढणार का, हा खरा प्रश्न आहे. उष्णतेच्या लाटांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे.