अमरावती : गेल्या महिन्यात तुरूंगातून जामिनावर सुटलेल्या एका तरूणाची आणि त्याच्या आईची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी तिवसा शहरात घडली. या दुहेरी हत्याकांडाने तिवसा हे तालुका मुख्यालय हादरून गेले आहे. अमोल वसंत डाखोरे (४०) आणि सुशीला वसंत डाखोरे (६५) अशी मृतांची नावे आहेत.
डाखोरे आणि अवझाड कुटुंबीय तिवसा येथील अशोक नगर परिसरात शेजारीच राहतात. त्यांच्यात जुने वैमनस्य आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुधाकर अवझाड यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अमोल डाखोरे आणि संतोष निंघोट (दोघेही रा. अशोक नगर) हे दोघे आरोपी होते. या गुन्ह्यासाठी ते तुरूंगात होते. अमोल डाखोरे आणि संतोष निंघोट यांची न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने तुरूंगातून गेल्या १३ ऑगस्ट रोजी सुटका झाली होती.
आरोपी रोहन सुधाकर अवझाड हा गेल्या वर्षभरापासून सूडाच्या भावनेने पेटला होता. बुधवारी सकाळी ९ वाजता रोहन हा अमोल डाखोरे याच्या घरी पोहचला. त्याने अमोलवर चाकूने वार केले. त्याला वाचविण्यासाठी अमोलची आई सुशीला आणि त्याचा लहान मुलगा दोघेही धावून गेले.
आरोपी रोहनने सुशीला यांच्यावरही चाकूने वार केले. या झटापटीत अमोलच्या मुलाला देखील चाकूच्या जखमा झाल्या. या हल्ल्यात अमोलचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या सुशीला यांचा तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमोलच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांनी आरोपी रोहन अवझाड याला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून परिस्थिती शांत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठीच आरोपीने हा हल्ला केल्याचे प्राथमिक चौकेशीत निष्पन्न झाले आहे. या घटनेमागे जुने वैमनस्य देखील कारणीभूत आहे. या दुहेरी हत्येच्या घटनेने अशोक नगर परिसर हादरून गेला आहे. तिवसा पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी आरोपी रोहन सुधाकर अवझाड याने हा हल्ला केल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.