बुलढाणा : एका महिन्यापासून चिखली तालुक्यातील शेतशिवारात आपल्या एका पिलासह वावरणाऱ्या आणि हजारो शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना भयभीत करणाऱ्या मादी अस्वल व तिच्या पिल्लाला वनविभागाने पकडले आहे. उंचपुऱ्या मादीला बेशुद्ध केल्यावर ती झाडावर अडकली होती. वनविभागाच्या चमूने तिची सुटका केली. या मादी अस्वल आणि तिच्या पिल्लाला जिल्ह्याच्या सीमेवरील सातपुडा पर्वत राजीतील अंबाबरवा अभयारण्या मध्ये सुखरूरित्या सोडण्यात आले .

या बुलढाणा वन परिक्षेत्र अंतर्गतच्या दहिगाव ( तालुका चिखली) परिसरातील गाव शिवारात अस्वलाने आठ दिवसापासून धुमाकूळ घातला होता. पिल्लू सोबत असल्याने मादी अस्वल जास्तच आक्रमक झाली होती. यामुळे दहिगाव पंच क्रोशीतील हजारो ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले होते. शेतकरी, रोजंदार मजूर यांना निंदणी, फवारणी आदि शेतकामासाठी शेतात जाणे अशक्य ठरले होते.

झाडावरून उतरवले

अस्वल व तिच्या पिल्लाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार गावकऱ्यांकडून झाली. स्थानिक पुढाऱ्यांनी सुद्धा तोंडी, लेखी निवेदने दिली. बुलढाणा डीएफओ सरोज गवस यांनी अस्वलाला रेस्क्यू करण्याचे आदेश दिले. एसीएफ वैभव काकडे आणि बुलढाणा आरएफओ सुनील वाकोडे यांनी रेस्क्यू पथकातील सदस्य शुटर संदीप मडावी,अमोल चव्हाण,पवन वाघ,पवन मुळे,प्रमोद गव‌ई,राणी जोगदंड आणि प्रमोद सावळे यांना दहीगांव परिसरात रवाना केले. बुलढाणा वन परिक्षेत्रच्या रेस्क्यू ( शोध बचाव ) पथकाने दहिगाव परिसरात मादी अस्वल व तिच्या पिल्लाचा पाठलाग केला. मात्र ती लवकर काबूत आली नाही.

सायंकाळी सदर अस्वल पिल्लासह आंब्याच्या झाडावर चढल्याचे दिसून आले. मादी अस्वलाला डॉट मारून बेशुद्ध करण्यात आले तर तिच्या पिल्लाचे फिजिकल रेस्क्यू करण्यात आले. मादी अस्वल झाडावरच बेशुद्ध झाल्याने तिला दोरी बांधून खाली उतरवण्यात आले.अस्वल काबूत घेण्यासाठी अखेर शार्प शुटर ने तिचा अचूक वेध घेत तिला बेशुद्ध केले. मात्र बेशुद्ध झाल्यावर ती भल्या मोठ्या झाडावर अडकली.

मादी अस्वल व पिल्लाला पिंजऱ्यात टाकून बुलढाणा येथील राणी बागेत आणण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार या दोन्ही अस्वलांना बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा अभयारण्यात सुखरूप सोडण्यात आल्याचे बुलढाणा आरएफओ सुनील वाकोडे यांनी सांगितले.

अभयरण्यात उतरताच भागविली तहान

या माता पुत्रालाविशेष वाहनद्वारे सोनाळा नजीकच्या अंबाबरवा अभयारण्यात सोडण्यात आले. या वाहनातून उतरताच मादी अस्वल ने खळखळ वाहणाऱ्या ओढ्यातील पाणी पिऊन आपली तहान भागविली.