निष्ठुर मातेचे कृत्य

नागपूर : एका निष्ठुर मातेने बाळाला जन्म देऊन चार दिवसांनी त्याला पदपथावर सोडून दिले. शेवटी एका महिला पोलीस शिपायाने त्या बाळाला मायेची ऊब दिली. अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना सोमवारी एलआयसी चौकात उघडकीस आली.

फळविक्रेती महिला सुनीता पराते (५०) या सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास एलआयसी चौक ते रेल्वेस्टेशन चौकादरम्यान असलेल्या पदपथावर फळविक्री करीत होत्या. दुपारी चार वाजताच्या सुमारास १९ ते २०वर्षे वयोगटातील एक तरुणी चार दिवसांच्या बाळासह तेथे आली. सुनीता यांच्यापासून काही अंतरावर ती बसली. तिने बाळाला दूध पाजले. अर्धा तास इकडे-तिकडे बघितल्यावर काही वेळाने तिने बाळाला कापडात गुंडाळून पदपथावर ठेवले व मोबाईलवर बोलण्याच्या बहाण्याने निघून गेली. मोबाईलवरील बोलणे संपल्यानंतर ती बाळाला जवळ घेईल, असा समज फळविक्रेत्या सुनीता यांचा झाला. मात्र, ती तरुणी बोलत-बोलत अचानक कुठेतरी निघून गेली. पण भूक लागल्यामुळे बाळ रडू लागल्याने सुनीता यांचे त्याच्याकडे लक्ष गेले. एका ग्राहकाला फळाच्या हातगाडीजवळ उभे करून ती बाळाजवळ गेली. तिने बाळाला कडेवर घेतले. सुमारे २० ते २५ मिनिटे बाळाच्या आईची वाट बघितली. परंतु, ती तरुणी परत आलीच नाही. दरम्यान, रस्त्यावरून सदर पोलीस ठाण्यातील गस्तवाहन जात होते.  पोलिसांना ही माहिती देण्यात आली. तेव्हा एका महिला पोलीस शिपायाने त्या बाळाला कवेत घेतले. पोलीस बाळाला घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी बालकल्याण विभाग तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. बाळाच्या आईची शोधाशोध करण्यात आली. मात्र, ती कुठेच न सापडल्यामुळे अखेर तिच्याविरुद्ध नवजात बाळाचा परित्याग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.