नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीची औषध निर्माता कंपनी ‘फायझर’मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संस्था भविष्यात ‘एम्स’च्या औषधनिर्माण शास्त्रतील पदव्यूत्तर विद्यार्थ्यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यासह काही औषधांवर वैद्यकीय चाचणी करायची असल्यास ‘एम्स’मध्ये करण्यासाठी एकत्र काम करतील.
हेही वाचा >>>“पदवीधर निवडणुकीच्या अवैध मत फेरमोजणी प्रसंगी…”, निकालानंतर धीरज लिंगाडे यांचा गौप्यस्फोट
नवीन सामंजस्य करारानुसार ‘एम्स’च्या औषधनिर्माण शास्त्रच्या विद्यार्थ्यांना दोन महिने ‘फायझर’च्या मुंबईतील कंपनीत ‘इंटर्नशिप’ करता येणार आहे. सोबत ‘फायझर’ला एखाद्या औषधासाठी ‘वैद्यकीय चाचणी’ घ्यायची असल्यास ‘एम्स’ त्यांना मदत करेल. या सामंजस्य कराराप्रसंगी ‘एम्स’च्या संचालिका (मेजर जनरल- निवृत्त) डॉ. विभा दत्ता, ‘फायझर लिमिटेड’चे वैद्यकीय प्रमुख डॉ. आशिष बोंडिया, ‘एम्स’च्या औषधनिर्माणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गणेश दाखले, ‘एम्स’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. अनंत खोत, ‘फायझर’चे डॉ. विकास मदान उपस्थित होते.
हेही वाचा >>>वर्धा : नरेंद्र चपळगावकर विद्रोहीच्या मांडवात! सौहार्दाच्या एका नव्या परंपरेची सुरुवात
या सामंजस्य कराराचा मोठा फायदा औषधनिर्माणसास्त्र विभागातील पदव्यूत्तर विद्यार्थ्यांना होणार आहे. ‘फायझर’मध्ये दोन महिन्यांचे ‘इंटर्नशिप’ पूर्ण केल्यावर त्यांना या कंपनीसोबत इतरही औषध उत्पादक कंपन्यांचे नोकरीची दारे उघडी होतील. या शिवाय, ‘एम्स’ला औषधनिर्माण विषयात राष्ट्रीय- आंतराष्ट्रीय परिषद घ्यायची असल्यास त्यासाठी ‘फायझर’ आपले तज्ज्ञ उपलब्ध करेल. तर ‘फायझर’ला एखाद्या औषधांची चाचणी घ्यायची असल्यास ‘एम्स’ मदत करेल. यानिमित्ताने येत्या काळात ‘एम्स’च्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होईल, असे डॉ. गणेश दाखले यांनी सांगितले.