वर्धा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी १५ दिवसांपासून निवडणूक यंत्रणेवर आरोपांची धूळ उडवून दिली आहे. मत चोरी हा शब्दप्रयोग त्यांनी चांगलाच चर्चेत आणला. त्यामुळे निवडणूक आयोग व भाजप विरुद्ध राहुल गांधी, असा सामना रंगला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नागपुरात बोलताना संशयाचे सावट अधिक गडद केले. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी स्फ़ोटक दावा केला आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन व्यक्ती त्यांच्याकडे आल्या होत्या. त्यांनी या निवडणुकीत १६० जागा जिंकून देतो, अशी हमी दिल्याचा दावा पवार यांनी केला. पवार यांचा हा दावा राजकारणात चांगलीच खळखळ निर्माण करीत आहे. हे असे तप्त वातावरण झाले असतानाच शरद पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमर काळे यांनी पुन्हा एक बॉम्ब फोडला.

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करून देण्यासाठी २ कोटी रुपयांची ऑफर त्यांना तसेच अनेक उमेदवारांना आली होती. अशी ऑफर देणारे हे राजकीय नेते नव्हते, तर मध्यस्थीच्या माध्यमातून आलेले होते, असा गौप्यस्फोट खासदार अमर काळे यांनी केला. पुढे खासदार काळे स्पष्ट करतात की, माझ्यासारखे अनेक असे आहेत की ज्यांना अशीच ऑफर आली होती. हे ऑफर देणारे म्हणत की मार्जिन देणाऱ्या मताधिक्यांनी तुम्ही जिंकाल. पण त्यासाठी २ कोटी रुपये द्यावे लागतील. हे ऑफर देणारे थेट माझ्याकडे आले नाहीत तर निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाची जबाबदारी असलेल्या माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांकडे हे लोक पोहचले. या कार्यकर्त्यांनी मला सांगितले की ‘ते’ भेटीची वेळ मागत आहे. मात्र मी हा प्रस्ताव तत्काळ नाकारला, असे खासदर अमर काळे यांनी स्पष्ट केले.

खासदार काळे यांनी आणखी एक गंभीर खुलासा केला. ते म्हणतात की, अशा ऑफर मलाच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांना देण्यात आल्या होत्या. विधानसभा व लोकसभा लढवणारे हे उमेदवार होते. ते त्यांना आलेला असा अनुभव सांगू शकतील. हा प्रकार माझ्यासाठी नवा नव्हता. लोकसभा निवडणुकीत पण मला अशी ऑफर आली होती. पण इतका पैसा आणायचा कुठून ? असा प्रश्न करीत खासदार काळे म्हणतात की, अशा मार्गाने जायचे नव्हते, म्हणून आम्ही अधिक खोलात गेलो नाही.

निवडणूक प्रक्रियेवर पण काळे यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी भूमिका मांडताना स्पष्ट केले की, निवडणुका पारदर्शी होणे गरजेचे आहे. जर निवडणुकीचे निकाल मॅनेज होत असतील तर देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे म्हणावे लागेल. काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी काही दिवसापूर्वी मतचोरीचे सादरीकरण केले होते. त्यात त्यांनी नेमकेपणे दाखवून दिले की मतं कशी चोरली जातात. चुकीच्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या जातात. असा हा प्रकार आहे, असे काळे नमूद करतात. मी ऑफर स्वीकारली असती तर निवडणुकीत कदाचित निकाल वेगळा लागला असता. पण लोकशाहीची किंमत पैश्यापेक्षा मोठी आहे. मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या या पद्धतीवर लगाम आवश्यक आहे.