वर्षभरापूर्वी तत्‍कालीन उद्धव ठाकरे सरकारने केवळ हनुमान चालिसाचे पठण केले म्‍हणून आम्‍हाला १४ दिवस तुरूंगात डांबले. एका महिला लोकप्रतिनिधीवर अन्‍याय करण्‍यात आला, तुरूंगात छळ झाला. माझी लहान मुले मला विचारत होती, तू असा काय गुन्‍हा केला, पण निर्दयी उद्ध‍ ठाकरे सरकारला केवळ आमच्‍यावर सूड उगवायचा होता, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी गुरूवारी येथे केला. भाषणादरम्‍यान, त्‍यांना अश्रू अनावर झाले होते.

श्री हनुमान‎ जन्मोत्सवाच्या पर्वावर तसेच‎ खासदार नवनीत राणा यांच्या‎ वाढदिवसानिमित्त बडनेरा मार्गावरील वीर हनुमानजी खंडेलवाल लॉन येथे गुरूवारी सामुहिक हनुमान चालिसा पठणाच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांच्‍यासह युवा स्‍वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आमदार डॉ. मिर्झांवर कृपादृष्टी! अद्यापही चौकशीला बोलावले नाही

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, ‘आम्‍ही जेव्‍हा मुंबईत मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्‍याची इच्‍छा बोलून दाखवली, तेव्‍हा शिवसेनेच्‍या उद्धव ठाकरे गटातील नेत्‍यांनी आम्‍हाला आव्‍हान दिले. ‘मुंबईत पाय ठेवून दाखवा, खड्ड्यात गाडल्‍याशिवाय राहणार नाही,’ अशी धमकी आम्‍हाला देण्‍यात आली. मी आणि रवी राणा मुंबईत पोहचलो, तेव्‍हा आम्‍हाला अटक करण्‍यात आली. सुरूवातीला वकिलांना विचारले, तेव्‍हा ते म्‍हणाले की, सहज जामीन मिळून जाईल, पण जेव्‍हा आमच्‍यावर राजद्रोहाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आल्‍याचे वकिलांना कळले, तेव्‍हा त्‍यांनाही धक्‍का बसला. संजय राऊत हे ज्‍येष्‍ठ नेते आहेत, वयाने मोठे आहेत, पण त्‍यांनीही आम्‍हाला धमक्‍या दिल्‍या. मी मुंबईत लढाई करण्‍यासाठी पाऊल ठेवले नव्‍हते, तर जनतेच्‍या भावना उद्धव ठाकरे यांच्‍यापर्यंत पोहचविण्‍याचा आमचा हेतू होता. पण, आम्‍हा दोघांना अटक झाली. १४ दिवस तुरूंगात ठेवण्‍यात आले. पिण्‍यासाठी देखील पाणी मिळत नव्‍हते. आमचा भयंकर छळ झाला’, असा आरोप नवनीत राणा यांनी केला.

हेही वाचा >>> रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे रिंगणात ?

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, ‘ तुरूंगात असताना आमच्‍यावर अत्‍याचार करण्‍यात आले. तेथील कर्मचारी आम्‍हाला हात जोडून सांगत होते, की आम्‍ही तुमची काहीच मदत करू शकणार नाही, काहीच अपेक्षा ठेवू नका. आम्‍हाला सरकारकडून आदेश आहेत. हनुमान चालिसाचे पठण करणे हा गुन्‍हा ठरतो का, हे उद्धव ठाकरे यांना विचारले पाहिजे. एका महिला लोकप्रतिनिधीचा छळ करणे, हे योग्‍य नव्‍हते. माझ्यावरील अन्‍यायाचे उत्‍तर महाराष्‍ट्रातील जनता नक्‍कीच देणार आहे. हनुमानाचे नाव घेतल्याने राजद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर हे महाराष्ट्राचे  दुर्दैव आहे. १४ दिवस आम्‍हाला तुरूंगामध्‍ये ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अहंकार मोडला जाईल, असे आपण तेव्‍हा सांगितले होते, ते खरे ठरले, असा दावा नवनीत राणा यांनी केला.