अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) विशिष्ट शैक्षणिक अर्हता तसेच अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीसाठी चाळणी परीक्षेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, नगर विकास विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग या विभागांमधील विविध संवर्गातील पदांसाठी ही चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे.
या परीक्षांची योजना, अभ्यासक्रम, कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण आणि दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येतील, असे ‘एमपीएससी’ने जाहीर केले आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या ४१०/२०२३ या जाहिरात क्रमांकानुसार सहायक प्राध्यापक, दंतपरिवेष्टनशास्त्र, गट ब, ४११/२०२३ नुसार सहायक प्राध्यापक, दंतविकृती व अणूजीवशास्त्र गट ब आणि ४१३/२०२३ नुसार सहायक प्राध्यापक, मुखशल्यचिकित्साशास्त्र, गट ब, १६/२०२५ जाहिरात क्रमांकानुसार सहायक प्राध्यापक, कृत्रिमदंतशास्त्र, गट ब, १८/२०२५ नुसार सहायक प्राध्यापक , दंतव्यंगोपचारशास्त्र, गट ब आणि २०/२०२५ या जाहिरात क्रमांकानुसार सहायक प्राध्यापक, दंतशल्यशास्त्र, गट ब या या संवर्गासाठी चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे.
गृह विभागाच्या ३३/२०२४ या जाहिरात क्रमांकानुसार विधी सल्लागार, गट अ पदासाठी तसेच ३४/२०२४ नुसार विधी अधिकारी, गट अ संवर्गासाठी चाळणी परीक्षा होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ३७/२०२४ क्रमांकाच्या जाहिरातीनुसार सहायक संचालक-आरोग्य सेवा (वाहतूक), सामान्य राज्य सेवा गट अ या पदासाठी चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. नगर विकास विभागाच्या ५०/२०२४ क्रमांकाच्या जाहिरातीनुसार नगर रचनाकार गट अ, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ०८/२०२४ क्रमांकाच्या जाहिरातीनुसार अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब (प्रशासकीय शाखा), उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या १४/२०२५ क्रमांकाच्या जाहिरातीनुसार सहायक प्रबंधक गट ब या संवर्गासाठी चाळणी परीक्षा होणार आहे.
विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि / अथवा अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींस अनुसरून विविध संवर्गासाठी ही चाळणी परीक्षा घेतली जाणार असल्याचे ‘एमपीएससी’ ने जाहीर केले आहे.
तीन वर्षांपुर्वी ‘एमपीएससी’ने सरळसेवा भरतीसाठी चाळणी परीक्षा संगणकाधारित करण्याचा निर्णय घेतला होता. याआधी ही भरती प्रक्रिया पारंपरिक लेखी पद्धतीने घेण्यात येत होती. प्रचलित पद्धतीने सरळसेवा परीक्षा ते निकाल या प्रक्रियेला तीन महिन्यांचा कालावधी लागत होता, तो आता कमी होण्यास मदत झाली आहे.