अमरावती : येत्या काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील उमेदवारांना सुगीचे दिवस येतील, तर इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात प्रचंड स्पर्धा बघायला मिळू शकते, असा अंदाज स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने काही दिवसांपुर्वी वर्तवला होता. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात एकूण १ हजार ५१६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. ‘ईडब्ल्यूएस’चा कट-ऑफ कमी लागला. त्यामुळे आपला अंदाज खरा ठरला, असे या स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या संघटनेचे म्हणणे आहे.
या परीक्षेत खुल्या (ओपन) प्रवर्गाचा कट-ऑफ ५०७.५०, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गाचा ४९०.७५, इतर मार्गासवर्गीयांचा ४८५.५० तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी) प्रवर्गाचा कट-ऑफ हा ४४५ इतका लागला आहे.
मराठा उमेदवारांना आता ‘एसईबीसी’ किंवा पात्र असल्यास ओबीसी असे दोनच प्रवर्ग उपलब्ध आहेत. मराठा उमेदवार –‘ईडब्ल्यूएस’ कोट्यातून बाहेर पडल्याने येत्या काळात सरळसेवा पदभरतीत ‘ईडब्ल्यूएस’चा कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे, असे स्पर्धा परीक्षार्थ्यांचे म्हणणे आहे. येत्या काळात ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारांना सुगीचे दिवस येतील. कमी गुणांवर सुद्धा निवड होऊ शकते, त्यामुळे संधी सोडू नका. तर ओबीसी प्रवर्गात प्रचंड स्पर्धा बघायला मिळू शकते.
मराठ्यांना एसईबीसी प्रवर्ग दिल्याने ते ‘ईडब्ल्यूएस’ मधून आधीच बाहेर पडले आहेत, ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गात असणारी लोकसंख्या आणि जातींचा विचार करता त्यांना स्पर्धा कमी असेल. तर कुणबी प्रमाणपत्र मिळवून बहुसंख्य मराठा-कुणबी उमेदवार ओबीसीमध्ये गेले आहेत किंवा येणाऱ्या काळात जाणार आहेत. एससी, एसटी, व्हीजे, एनटी प्रवर्गात आहे तशीच स्पर्धा असण्याची शक्यता असल्याचे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने काही दिवसांपुर्वी नमूद केले होते. आता ‘एमपीएससी’च्या निकालानंतर याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
या परीक्षेत अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गाचा ४४७ तर अनुसूचित जमातीचा (एसटी) कट-ऑफ ४१५ इतका लागला आहे. एकीकडे आजवरचा सर्वाधिक कट-ऑफ यावेळी लागल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. खुल्या प्रवर्गातील कट-ऑफ देखील मोठा आहे. ‘एमपीएससी’तर्फे २७ ते २९ मे या कालावधीत राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत चांगलीच स्पर्धा पहायला मिळते. त्यातच परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या तसेच अन्य मुद्यांसंदर्भात विविध न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आल्याचे ‘एमपीएससी’ने स्पष्ट केले आहे.