नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तीन महिन्यांपूर्वी राज्यसेवा २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यानंतर वैद्यकीय तपासणीही झाली. परंतु, वैद्यकीय मंडळाकडून अद्याप वैद्यकीय चाचणीचे अहवाल ‘एमपीएससी’ला प्राप्त न झाल्याने उत्तीर्ण उमेदवारांना पसंतीक्रम देणे, त्यानंतर पुन्हा तात्पुरती यादी जाहीर करणे, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टिंग आऊट) पर्याय देणे आणि त्यापुढच्या सर्वच प्रक्रिया थांबल्या आहेत. त्यामुळे राज्यसेवेसारखी महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही परीक्षार्थ्यांच्या पदरी निराशा आहे. विशेष म्हणजे लोकसत्ताच्या वृत्तानंतर ‘एमपीएससी’कडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जून २०२३ साली राज्यसेवा गट-अ आणि गट-ब दर्जाच्या ३०३ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये मुख्य परीक्षा व ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या. राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २६ सप्टेंबर २०२४ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. वैद्यकीय मंडळाने संबंधित उमेदवारांच्या तपासणीनंतर दिलेल्या वैद्यकीय अहवाल / प्रमाणपत्रांच्या प्रती उमेदवारांना आयोगातर्फे पाठवण्यात आल्या. तसेच सदर अहवालाविरुद्ध आक्षेप असणाऱ्या उमेदवारांना अपील करण्याची मुभा देखील देण्यात आली होती. त्यानुसार अपील केलेल्या उमेदवारांनी संबंधित वैद्यकीय मंडळासमोर विहित तारखेस पुनःश्च उपस्थित राहणे अभिप्रेत होते. जे उमेदवार अपीलानुसार पुनःश्च वैद्यकीय चाचणीस उपस्थित होते, त्यांच्यापैकी काही उमेदवारांचे वैद्यकीय अहवाल वैद्यकीय मंडळाकडून अद्याप प्राप्त झालेले नाहीत. याबाबत संबंधित अपीलीय वैद्यकीय मंडळाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सदर वैद्यकीय अहवाल प्राप्त करून घेऊन पद पसंतीक्रम मागविण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच उमेदवारांची पुढील प्रक्रिया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अन्न व औषध प्रशासकीय सेवांची माहिती

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-२०२३ च्या परीक्षेच्या पेपर्सच्या तपासणीसंदर्भात समाजमाध्यमावर प्रसारीत झालेल्या कार्यालयाने अंतर्गत टिप्पणीच्या अनुषंगाने कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये याकरिता स्पष्ट करण्यात येते की, पारंपरिक स्वरुपाच्या उत्तरपुस्तिकांची तपासणी संबंधित विषयाच्या तज्ञांकडूनच करण्यात येत असते व या उत्तरपुस्तिकांवर उमेदवारांची कोणत्याही स्वरुपाची वैयक्तिक माहिती नसते (कॉडिग केलेले असते). तथापि, तज्ञांकडून मुल्यांकन करतांना काही त्रुटी राहीलेली आहे काय? अशा तांत्रिक बाबींची तपासणी स्थायी आदेशानुसार आयोगातील सहायक कक्ष अधिकारी स्तरावर गोपनीयरित्या करण्यात येत असते जसे की सर्व उत्तरे तपासण्यात आलेले आहेत काय?, अतिरिक्त / ज्यादा सोडविलेल्या प्रश्नालाही गुणांकन केलेल आहे काय?, आक्षेपार्ह लिखाण केले आहे काय? इत्यादी विसंगती / त्रुटी असलेल्या बाबी संबंधित तज्ञाच्या निदर्शनास आणण्यात येतात व उचित त्या दुरुस्त्या संबंधित तज्ञांकडूनच करून घेण्यात येतात. आयोगातील सहायक कक्ष अधिकाऱ्याने कोठेही गुणांकन / मुल्यांकन / तपासणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सदर पध्दत आयोगामध्ये पूर्वीपासूनच अवलंबिण्यात येत असून ती नव्याने अनुसरण्यात आलेली नाही. आयोगाच्या कार्यालयातील अंतर्गत टिप्पणी समाजमाध्यमावर प्रसारीत झालेल्या मुद्यांबाबत यथोचित कारवाई आयोगामार्फत करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.