नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. नागपुरातील भट सभागृहात शनिवारी दुपारी झालेल्या कार्यक्रमातही त्यांनी नागपुरातील एका मुस्लीम हाॅटेलच्या समोर इतर धर्मीयांच्या बिर्याणीसाठी रांगा का लागतात, त्याबाबत भाष्य केले.
विदर्भ एडव्हेंचर असोसिएशन, नागपूरतर्फे भट सभागृहात आयोजित ‘स्पोट्स ॲज ओ करियर सेमिनार’मध्ये नितीन गडकरी बोलत होते. गडकरी पुढे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने एखाद्या गोष्टीत पूर्ण पारंगत असणे गरजेचे आहे. मुंबईत माझे एक आवडते हाॅटेल आहे. तेथील शेफ माझ्या ओळखीचा आहे. या शेफला भेटून त्याचे वेतन विचारले. त्याने मला १५ लाख रुपये महिना असल्याचे सांगितले. तो विविध पदार्थ बनवण्यात पारंगत असल्याने त्याला हे वेतन मिळते. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात मेहनत घेऊन पारंगत झाल्यास त्याला चांगले फळ मिळणे शक्य आहे. नागपुरातील एका गल्लीत मुस्लीम व्यक्तीचे लहान हाॅटेल आहे. या हाॅटेलच्या समोर रोज ग्राहक मोठी रांग लाऊन उभे असतात. येथील बिर्यानी खूप प्रसिद्ध आहे.
क्रिकेटचे कोच खूप ओरडायचे
नितीन गडकरी म्हणाले, मला लहानपणी क्रिकेट खूप आवडत होते. मी रेशीमबाग मैदानात खेळायला जात होतो. येथे कावळे सर आम्हाला शिकवायचे. ते चूक झाल्यास खूपच ओरडत होते. त्यांचा उद्देश चांगले खेळाडू घडवणे होता. त्यांनी अनेक चांगले खेळाडू घडवले, असेही गडकरी यांनी सांगितले.
जगात दहा लाख शिक्षकांची गरज
योगासनाला जगभरात मान्यता मिळत आहे. त्यामुळे जगभरात दहा लाख योगा शिक्षकांची गरज आहे. या विषयात तज्ज्ञ असलेल्याला रोजगाराची संधी आहे. प्रत्येकाने परिश्रम घेतल्यास त्याला त्याचे निश्चित फळ मिळते, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
नागपुरात दोन क्लब
नितीन गडकरी म्हणाले, मी नागपुरात दोन क्लब तयार करणार आहे. एक क्लब १३ एकरमध्ये तर दुसरे ३६ एकरमध्ये असेल. या क्लबच्या सदस्यता शुल्कातून येथे अद्यावत खो- खो, कबड्डीसह इतरही खेळाचे मैदान विकसित केले जाईल. त्यावर खेळाडूंना माफक दरात खेळता येईल. तर क्लबमध्ये खाण-पाणासाठी येणाऱ्यांना येथे चांगल्या सोयी मिळतील. त्यामुळे खेळाडूंना माफक दरात चांगल्या जागेवर अद्यावत सोय उपलब्ध होईल, असेही गडकरी म्हणाले.