नागपूर : देशात नावाजलेल्या रुग्णालयांमध्ये अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेचे (एम्स) नाव वरच्या क्रमांकावर आहे. नागपुरातील एम्सचाही विकास झपाट्याने होत आहे. दरम्यान या रुग्णालयात एक रुग्ण सापाने दंश केलेला आला. या रुग्णावर उंदीर चावल्यानंतरचे उपचार झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. रुग्ण दगावल्यावर झालेल्या आरोपाबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपुरातील खापरी परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाला २ ऑगस्टला सर्पदंशानंतर एम्समध्ये दाखल केले होते. ९ ऑगस्टला त्याचा मृत्यू झाल्यावर प्रसारित झालेल्या चित्रफितीत कुटुंबियांकडून वरील आरोप करण्यात आला. ओम येरुणकर (१७) असे मृत तरुणाचे नाव आहे. ओमचे वडील नंदकिशोर हे मिहान परिसरात एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. नंदकिशोर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, मुलाला घरी काहीतरी चावले. उंदीर असावा असा अंदाज त्याने वर्तवला. प्रकृती खालावल्यावर त्याला एम्स रुग्णालयात नेले. येथेही ओमने उंदीर चावल्याचा अंदाज वर्तवला. परंतु, प्रत्यक्षात काय चावले हे माहित नसल्याचेही डॉक्टरांना सांगण्यात आले होते.

दरम्यान एम्समधील डॉक्टरांनी उंदीर चावला असा अंदाज बांधून उपचार सुरू केले. परंतु, प्रकृती खालावत असतानाही डॉक्टरांना सर्पदंशाचा अंदाज आला नाही. जास्त प्रकृती खालावल्यावर रुग्णाला अतिदक्षता विभागात हलवले गेले. येथे हृदयाचे ठोके थांबल्याने छातीवर दाब देऊन ठोके परत सुरू करण्यात आले. त्यानंतर रुग्णाला जीवनरक्षण प्रणालीवर ठेवले गेले. दरम्यान ९ ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला. साप चावला असताना डॉक्टरांनी अचूक निदान न केल्याने ओमचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे एम्सच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या विषयावर एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. पी. पी. जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

रुग्ण स्ट्रेचरवरच पडून राहिला

ओमला २ ऑगस्टच्या रात्री एम्समध्ये हलवल्यावर बरेच तास तो स्ट्रेचरवरच होता. त्याला स्ट्रेचरवरच सलाईन व इंजेक्शन लावले गेले. नातेवाईक डॉक्टरांना लक्ष देण्याची विनंती करत होते. परंतु डॉक्टर इंजेक्शन दिल्याचे सांगत होते. प्रकृती बिघडत असतानाही काळजी घेतली नाही, असा नातेवाईकांचा आरोप आहे.

साप चावल्याचे लक्षण ओळखता येत नाही काय?

रुग्णाला सापाने दंश केल्यावरचे लक्षण हळूृ हळू दिसू लागले होते. हे लक्षण नातेवाईकांना वैद्यकीय ज्ञान नसल्याने ओळखने शक्य नाही. परंतु एम्सच्या डॉक्टरांना ते कळणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे डॉक्टरांनी मुळात या रुग्णाकडे लक्षच दिले नसल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला.