scorecardresearch

क्रीडा घोटाळय़ातील १०८ नगरसेवकांची निर्दोष मुक्तता ; खटला निकाली निघण्यासाठी २१ वर्षे

२००१ मध्ये दाखल झालेला हा खटला निकाली काढण्यासाठी सुमारे २१ वर्षे लागली.

नागपूर : महापालिकेच्या इतिहासात गाजलेल्या क्रीडा घोटाळय़ातील प्रलंबित खटल्याचा निर्णय न्यायालयाने जाहीर केला असून अतिरिक्त मुख्य न्यायमूर्तीनी मंगळवारी ठोस पुराव्याअभावी सर्व १०८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

२००१ मध्ये दाखल झालेला हा खटला निकाली काढण्यासाठी सुमारे २१ वर्षे लागली. या प्रकरणात ९९ विद्यमान व माजी नगरसेवक, साहित्य विक्रेते आणि महापालिका अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले होते.

त्यात तत्कालीन क्रीडा अधिकारी साहेबराव राऊत, आशा बनारसी, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, माजी महापौर कल्पना पांडे, अर्चना डेहनकर, विक्रम पानकुले, रमेश सिंगारे आदींचा समावेश होता. खटला प्रलंबित असताना काहींचा

मृत्यूही झाला.

२०१७ पासून या प्रकरणात साक्षी-पुरावे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आणि विकास कुंभारे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सहा साहित्य दुकानदार, चार मनपा अधिकारी यांच्याविरोधात मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोप निश्चित केले होते.

अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित या खटल्यावर मंगळवारी न्यायालयाने निर्णय दिला.

अतिरिक्त मुख्य न्यायमूर्तीनी मंगळवारी सर्व १०८ आरोपींची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे, अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगावकर, अ‍ॅड. उदय दुबळे, अ‍ॅड. सुभाष घारे यांनी काम पाहिले.

घोटाळय़ाची पार्श्वभूमी

२००० मध्ये राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत क्रीडा साहित्य घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नगरविकास खात्याचे तत्कालीन सचिव नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. नगरसेवकांनी क्रीडा मंडळांना साहित्य देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा ठपका नंदलाल यांनी अहवालात ठेवला होता. त्यासोबतच सदर पोलीस ठाण्यात तब्बल १०८ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात भाजपसह काँग्रेस, रिपाइं आणि काही अपक्ष नगरसेवकांचाही समावेश होता. दरम्यान, क्रीडा साहित्य घोटाळय़ाची व्याप्ती अधिक असल्याने राज्य सरकारने क्रीडा साहित्य घोटाळय़ाची चौकशी गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केली होती. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात भांदविच्या कलम ४२०, ४०४ आणि ४६८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. तब्बल चार ते पाच वर्षांनंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, हे विशेष.

याला घोटाळा म्हणता येणार नाही. हा केवळ तेव्हाच्या राजकारणाचा भाग होता. क्रीडा साहित्य वाटपामध्ये काहीही लेखी नियम तयार नव्हते. त्यामुळे साहित्याचे वाटप हे प्रत्येक नगरसेवक त्यांच्या सुविधेनुसार करत होते. मधल्या काळात भाजप आणि काँग्रेस असा राजकीय संघर्ष निर्माण झाल्याने बिनबुडाचे आरोप करण्यात आले होते. मात्र, हा घोटाळा नव्हता.

डॉ. कल्पना पांडे, माजी महापौर.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur bench acquitted 108 corporators from sports scam zws

ताज्या बातम्या