महापालिका निवडणूक पाश्र्वभूमीवर विधान केल्याने भाजप वर्तुळात चर्चेला प्रारंभ
भाजपच्या काही विद्यमान नगरसेवकांचा लोकसंपर्क संपलेला आहे, काहींना त्यांच्या वॉर्ड सीमाही माहिती नाही, असे शहर अध्यक्ष व आमदार कृष्णा खोपडे यांनी केलेले वक्तव्य कोणाच्या संदर्भात आहे, याची चर्चा आता पक्षाच्या वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला पक्ष लागला असल्याच्या पाश्र्वभूमीवर खोपडे यांची नगरसेवकांच्या संदर्भातील टिप्पणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या शहरातील विधानसभा मतदारसंघ निहाय मंडळ अध्यक्षांच्या नियुक्तया नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. या निमित्त झालेल्या कार्यक्रमात खोपडे यांनी शहर अध्यक्ष म्हणून संघटनात्मक बाबींवर मते मांडली. कुठल्याही परिस्थितीत २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुका जिंकायच्याच असा निर्धार व्यक्त करताना त्यांनी पक्षाच्या काही विद्यमान नगरसेवकांच्या निष्क्रियेतेवरही बोट ठेवले. पक्षाने केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला देत खोपडे म्हणाले, काही नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डाची सीमाही माहिती नाही, कारण ते फिरतच नाहीत. लोकांशी त्यांचा संपर्क तुटला आहे. एखाद-दुसरा कार्यक्रम घ्यायचा व त्याचे छायाचित्र वर्तमान पत्राकडे पाठवून द्यायचे,असे काही नगरसेवकांचे धोरण आहे. ही बाब खपवून घेतली जाणार नाही. खोपडे यांचा हा इशारा कोणत्या नगरसेवकांच्या संदर्भात होता हे स्पष्ट होऊ शकले नाही, मात्र पक्षपातळीवर . ‘कोण हे नगरसेवक’ याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
खोपडे हे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात त्यामुळे त्यांच्याच मतदारसंघातील हे चित्र आहे का? की मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिम या मतदारसंघातील नगरसेवकांच्या संदर्भात त्यांचा इशारा होता? असे एक नव्हे तर अनेक प्रश्न त्यांच्या विधानामुळे निर्माण झाले आहेत.
विशेष म्हणजे महापालिकेत भाजपचीच सत्ता आहे व पक्षाचेच शहर अध्यक्षच काही नगरसेवकांवर ते निष्क्रिय असल्याचा ठपका जाहीरपणे ठेवत आहेत. याचाच अर्थ पक्षपातळीवर सर्वकाही आलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे.आगामी महापालिका निवडणुका लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांची संख्या भाजपमध्ये अधिक आहे. विद्यमान नगरसेवकांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवून स्वत:ची दावेदारी पुढे करण्याचे प्रकारही पक्षात नवीन नाहीत, तसेच पक्षाचे पदाधिकाऱ्यांबरोबर खटके उडाल्याने काही नगरसेवक लक्ष्य ठरले आहेत. नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या धोरणाचा आधार घेऊन जुन्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा नेत्यांच्या राजकीय खेळीचा भाग असू शकतो, अशी शंकाही काही नेत्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पक्षातील सूत्रांनीच दिलेल्या माहितीनुसार पश्चिम आणि दक्षिण-पश्चिममधील काही नगरसेवकांचा अपवाद सोडला तर बहुतांश नगरसेवकांच्या प्रभागात नाराजीचे सूर आहेत. रस्त्याचे डांबरीकरण सोडले तर नगरसेवकांना आपल्या कामाचा ठसा उमटविता आला नाही. अशीच तक्रार काही महिला नगरसेवकांच्या बाबतीतही आहे. निवडणुकीला वर्ष असल्याने आतातरी नगरसेवकांनी कामाला लागावे म्हणून खोपडेंनी अप्रत्यक्षपणे इशारा दिल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.