नागपूर : यशोधरा पोलीस ठाणे हद्दीतील कांजी हाऊस परिसरात शनिवारी भर दिवसा धारधार शास्त्राने वार करत एकाचा खून करण्यात आला. सचिन उर्फ सोनू ओमप्रकाश साहू असे मृताचा नाव आहे. सोनू साहू हे उत्तर नागपुरातील भारतीय जनता पक्षाचे वाॅर्ड अध्यक्ष होते, अशी माहिती मिळत आहे. जुन्या आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मृत साहूच्या मुलाचा आज शनिवारी वाढदिवस होता. त्याच्या तयारीचे साहित्य आणण्यासाठी ते बाहेर पडले आणि वाटतेच कांजी हाऊस परिसरात दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली. सोनू साहू यांनी बाबू गौर नावाच्या व्यक्तिकडून पाच नर्षांपूर्वी १ लाख रुपये कर्जाने घेतले होते. यावरून दोघांमध्ये ऑगस्ट महिन्यात भांडणही झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गौर हे धमकी देत पैसे मागत असल्याने सोनूने यापूर्वी पोलिसांत तशी तक्रारही केली होती. त्यावरूनच शनिवारी दुपारी चौघांनी सोनूवर हल्ला चढवत त्याचा धारदार शस्त्राने वार करत खून केल्याचाही पोलिसांना संशय आहे. माहिती मिळताच घटनास्थळी धावलेल्या पोलिसांनी परिसरात सीसीटीव्हीची तपासणी करत मारेकऱ्यांचा माग घेणे सुरू केला आहे.

दोन दुचाकींवर आलेले चार मारेकरी संपूर्ण तयारीनिशी आल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनूच्या खूनानंतर चौघेही फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. तुर्तास आर्थिक वैमनस्यातून खून झाल्याचे प्राथमिक तपासणीत निदर्शनास आल्याने पोलिसांनी गौर कुटुंबातील काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सोनू साहूचे काही दिवसांपूर्वी गौर आणि प्रतिक नावाच्या दोन व्यक्तींशी भांडण झाले होते. त्यामुळे पोलीस दोन्ही बाजू तपासून पहात आहे. मारेकरी पळाले असल्याने त्यांच्या अटकेनंतरच खुनाच्या कारणांचा उलगडा होईल.’ – निकेतन कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ पाच.

साहू हे भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष असले तरी त्यांच्या खुनामागे राजकीय वैमनस्य कारण नाही. हा त्यांचा आर्थिक वाद होता. साहू यांनी घेतलेल्या कर्जापैकी कर्जाच्या रकमेवरून त्यांचा काही जणांशी वाद होता, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे हा राजकीय वाद अथवा वैमनस्याचा विषय नाही. – प्रा. संजय भेंडे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा</strong>.