scorecardresearch

वय कमी पडल्याने हुकली अमेरिकेची ३३ लाखांची ‘ऑफर’!, पंधरा वर्षीय वेदांतने घेतले ‘युट्यूब’वरून शिक्षण

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याला नव्याने ‘ऑफर’ देणार असल्याचे कंपनीने वेदांतला आश्वासन दिले आहे.

वय कमी पडल्याने हुकली अमेरिकेची ३३ लाखांची ‘ऑफर’!, पंधरा वर्षीय वेदांतने घेतले ‘युट्यूब’वरून शिक्षण

नागपूर : एका नामवंत अमेरिकन कंपनीने पंधरा वर्षीय वेदांत राजू देवकातेला चक्क ३३ लाखांच्या नोकरीची ऑफर दिल्याचे ऐकून नवल वाटेल. मात्र, हे खरे आहे. टाळेबंदीच्या काळात ‘युट्यूब वरून ‘सॉफ्टवेअर कोडिंग’चे शिक्षण घेत कुणालाही न सांगता वेदांतने एका स्पर्धेत भाग घेतला आणि दोन दिवसांत २,०६६ ओळींचे ‘कोडिंग’ केले. एक हजार ‘सॉफ्टवेअर डेव्हलपर’ला मात देत वेदांतने ही स्पर्धा जिंकली. ही किमया पाहूनच अमेरिकन कंपनीने वेदांतला इतक्या मोठ्या नोकरीची ऑफर दिली.

वेदांत राजू देवकाते हा नागपूरच्या रमणा मारुती परिसरात राहतो. सध्या तो शहरातीलच शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकतो. दोन वर्षांपूर्वी करोनामुळे टाळेबंदी लागली आणि शाळा बंद झाल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. शाळा बंद असल्याने घरात बसूनच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. मात्र, याच कालावधीचा वेदांतने सोन्यासारखा वापर करून घेतला. वेदांतने टाळेबंदीमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत घरातील जुन्या ‘लॅपटॉप’च्या मदतीने ‘युट्यूब’वर ‘सॉफ्टवेअर’ संबंधित अनेक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. ‘युट्यूब’वरूनच त्याने ‘सॉफ्टवेअर कोडिंग’चे शिक्षण घेतले. अवघड असणारी ‘सॉफ्टवेअर कोडिंग’ही तो शिकला. आईच्या जुन्या ‘लॅपटॉप’वर तो हे सगळे शिकत होता. एकदा त्याला ‘वेबसाईट डेव्हलपमेंट’ स्पर्धेची माहिती मिळाली. त्याने कुणालाही न सांगता त्या स्पर्धेत भाग घेतला आणि दोन दिवसांत २,०६६ ओळींचे कोडिंग केले. एक हजार ‘सॉफ्टवेअर डेव्हलपर’ला मात देत त्याने ही स्पर्धा जिंकली.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नव्याने ‘ऑफर’ वेदांतला अमेरिकन कंपनीने नोकरीसाठी तब्बल वार्षिक ३३ लाख ५० हजारांच्या वेतनाची ऑफर पाठवली. नंतर वेदांतने इतक्या कमी वयात एवढी मोठी कमाल केली असल्याचे सर्वांच्या समोर आले. आश्चर्य म्हणचे, वेदांतच्या या कर्तृत्वाची माहिती त्याच्या कुटुंबात कुणाला नव्हती. वेदांचे वय फार कमी असल्याने सध्या त्याची ही संधी हुकली असली तरी त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याला नव्याने ‘ऑफर’ देणार असल्याचे कंपनीने वेदांतला आश्वासन दिले आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur boy missed job offer of 33 lakhs by american company due to age factor zws

ताज्या बातम्या