अमरावती : लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. मुलगा किंवा मुलगी आपल्या लग्नाचे स्वप्न पाहतात. आपला भावी जोडीदार कसा असेल, याची कल्पना करतात आणि जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरते, तेव्हा त्यापेक्ष आनंदाची दुसरी कोणतीही गोष्ट असू शकत नाही. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू असताना अमरावतीत एका नवरीची हाती तिरंगा घेऊन घोड्यावरून निघालेली वरात चर्चेचा विषय ठरली आहे. देशभक्तीचा जागर करतानाच ‘मुलगा-मुलगी एकसमान’ हे केवळ बोलूनच नाही, तर कृतीत आणल्याचे चित्र यावेळी दिसले. अमरावतीच्या यशोदा नगर येथील भास्करराव सोनवणे या आदर्श शिक्षकांच्या कुटुंबातील नवरीची हातात राष्ट्रध्वज घेऊन घोड्यावर बसून मोठ्या दिमाखात वाजत गाजत वरात काढण्यात आली. स्त्री पुरुष समानतेचा संदेश सोनवणे कुटुंबांनी या वरातीतून दिला.

यशोदा नगर येथे सिद्धार्थ सोनोने यांचे कुटुंब वास्तव्याला आहे. त्यांचे वडील भास्करराव सोनोने हे शिक्षक होते. त्यांना महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांची नात व न्यायालयात लिपिक म्हणून सेवानिवृत्त झालेले सिद्धार्थ सोनोने यांची धाकटी मुलगी कोमल हिचा विवाह क्रांती मनोहर यांच्याशी शनिवार (ता.१०) रोजी सायंकाळी पार पडला. या लग्नाच्या पुर्वसंध्येला शुक्रवारी सायंकाळी नववधू कोमल हिची वरात वाजत गाजत काढण्यात आली.ही वरात शहरात कुतूहल व कौतुकाचा विषय ठरला आहे, अशा प्रकारची नवरीची मिरवणूक सोनोने परिवाराने दुसऱ्यांदा काढली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थोरल्या बहिणीचीही काढली होती घोड्यावरून वरात

सिद्धार्थ सोनोने यांची थोरली मुलगी शीतल हिचा विवाह २०१८ मध्ये पार पडला त्यावेळी १ फेब्रुवारी २०१८ रोजी वधूची थोरली बहीण शीतल हिचीही वरात घोड्यावरून वाजत गाजत काढण्यात आली होती. मुलगा व मुलगी आम्ही समान मानतो. यापूर्वीही वधूच्या थोरल्या बहिणीचे अशीच घोड्यावरून वरात काढली होती म्हणूनच धाकट्या मुलीचीही मिरवणूक काढून बेटी बचाव, बेटी पढाव या अभियानाला चालना मिळावी व जुन्या आठवणीला उजाळा मिळावा. यासाठी घोड्यावरून वरात काढण्यात आली, अशी भावना नवरीचे आजोबा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त भास्करराव सोनोने यांनी व्यक्त केली. वधूचे काका राजेश सोनोने हे यांची ही संकल्पना होती. देशाप्रती असलेला आदर त्यांनी या माध्यमातून व्यक्त केला. ही वरात चर्चेचा विषय ठरली.