परिसरातील नागरिक त्रस्त
‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ चे आवाहन महापालिकेकडून केले जात असले तरी प्रत्यक्षात शहरातील स्थिती अत्यंत वाईट आहे. एकूण १ लाख ६ हजार खुल्या भूखंडांपैकी तब्बल १२ हजार ६०० भूखंडांवर कचरा साचलेला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बाब गंभीर असून यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, या सर्व भूखंडधारकांना महापालिकेने नोटीस बजावल्या. पण कारवाई केली नाही. कधीकाळी स्वच्छतेत देशात अग्रस्थानी असलेल्या काही शहरांपैकी एक असलेल्या नागपूरची वाटचाल बकाल शहराकडे सुरू आहे. शहर स्वच्छतेसाठी महापालिका नियमितपणे उपक्रम राबवते. पावसाळापूर्व नियोजनातही खुल्या भूखंडावरील कचरा काढण्याचा समावेश आहे. पावसाळ्यात खुल्या भूखंडावरील कचरामुळे डासांचे प्रमाण वाढते. डेंग्यूची साथ पसरण्याचा धोका असतो. शहरात दरवर्षी या रुग्णांची संख्या वाढती आहे. त्यामुळे महापालिका खुल्या भूखंडावर कचरा साचल्यास नोटीस देत कारवाई करते. शहरात दक्षिण पश्चिम, पश्चिम, दक्षिण आणि पूर्व नागपुरात खुले भूखंड अधिक आहेत. काही नागरी वस्त्यांमध्ये आहेत. तेथील नागरिक या ठिकाणी कचरा टाकतात. तो नियमित उचलला जात नाही. त्यामुळे ढिग तयार होते. पाऊस पडल्यावर त्यातून दुर्गंधी सुटते व त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होतो. याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अनेक भूखंड मालकांची नोंद महापालिकेकडे नाही. त्यामुळे कारवाईत अडचणी येतात.

सर्वाधिक खुले भूखंड सोमलवाड्यात

अविकसित लेआऊटमध्ये सर्वाधिक ७ हजार २३३ खुले भूखंड सोमलवाडा भागात आहेत. त्याखालोखाल ६ हजार ४४१ भूखंड झिंगाबाई टाकळी तर ४ हजार २८७ भूखंड वाठोडा अंतर्गत आहेत. यातील अधिकाधिक भूखंडाची विक्री १९८४ ते ८५ या काळात झाली आहे. यातील ५० टक्के भूखंडावर कचऱ्याचे साम्राज्य आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मोकळ्या भूखंडावर कचरा किंवा पाणी साचले असेल तर भूखंड मालकांवर कारवाई केली जात आहे. यासाठी पावसाळ्यात झोन पातळीवर विशेष पथक तयार करण्यात आले आहे.” – डॉ. गजेंद्र महल्ले ,आरोग्य अधिकारी (घनकचरा) महापालिका