नागपूर : भाजपच्या नगर पंचायत अध्यक्षपदांच्या उमेदवरांच्या नावाची घोषणा होण्याच्या काही तासापूर्वी मौदा तालुक्यातील काँग्रेस नेते व प्रदेश सचिव राजा तिडके यांनी रविवारी भाजप नेते व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेससाठी हा धक्का मानला जातो.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचे समर्थक बाबुराव तिडके यांचे राजा उर्फ प्रसन्ना तिडके हे चिरंजीव आहेत. यापूर्वी त्यांनी काँग्रेसकडूम मौदा तालुक्यातील जि.प. सर्कलमधून निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. मौदा ही नगरपंचायत झाली आहे, काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चाही होती.
भारतीय जनता पक्षाची नगर पंचायत अध्यक्षपदाच्या उमेदवारांची यादी रविवारी जाहीर होणार असे यापूर्वीच सांगण्यात आले होते. ती दुपारपर्यंत जाहीर झाली नव्हती. त्यापूर्वीच नागपूरमध्येआयोजित एका कार्यक्रमात तिडके यांचा भाजप प्रवेश झाला. त्यांना भाजपकडून नगरपंचायत अध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार. टेकचंद सावरकरजी व भाजप तालुका मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली प्रसन्ना (राजाभाऊ) तिडके, काँग्रेसचे दिलीप सिरसाम, कल्पनाताई मानकर, माजी नगरसेविका नंदाताई इनवाते, सावित्रीताई काटकर, वर्षाताई लारोकर, नाना इंगळे, राजेंद्र जैस्वाल, पृथ्वीराज गुजर, नितेश सुपारे यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी चांगोजी तिजारे, मनीराम यादव, शरद भोयर, मंगेश ठोंबरे, नरेश मोटघरे, खुशाल तांबडे, रमेश कुंभलकर, भूषण सावरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
