अकोला : विकास कामात दिरंगाई व गुणवत्तेत कुठलीही तडजोड नकोच. समतोल व सर्वसमावेशक कार्याला प्राधान्य द्या, असे निर्देश कृषिमंत्री तथा वाशीमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. यावेळी बैठकीला लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. बैठकीत ग्रामीण-शहरी विकास, पाणीटंचाई, शेती, आरोग्य, क्रीडा व तीर्थक्षेत्रांचे श्रेणीवर्धन यासारख्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

वाशीम जिल्ह्याला यावर्षी ४०६.०७ कोटींच्या निधीपैकी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेमध्ये ३१५ कोटी, विशेष घटक योजनेमध्ये ७७ कोटी व आदिवासी उपयोजनामध्ये १४.०७ कोटी नियतव्यय मंजूर झाला आहे. यासाठी सर्व यंत्रणानी तातडीने मागणी सादर करुन प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्राप्त करुन घ्यावी. मंजूर नियतव्यय खर्च करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणेने सुक्ष्म नियोजन करावे. प्रशासकीय दिरंगाई आणि कामांच्या गुणवत्तेमध्ये तडजोड सहन केली जाणार नाही, असे पालकमंत्री म्हणाले.

निधीचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांसाठी होईल याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांवर प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा करावा. जिल्ह्यात चियाचे उत्पादन दर हेक्टरी चांगले मिळत असून यासाठी शेतकऱ्यांना चिया पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहीत करावे. तसेच प्रत्येक तालुक्यात औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. विकासाची चांगली कामे करून जिल्ह्याचे नाव लौकिक कसे करता येतील यासाठी विभागांनी प्रयत्न करावे, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

९४.५० कोटी रुपये शासनाकडून प्राप्त

जिल्हा वार्षिक योजना(सर्वसाधारण) अंतर्गत ३१५ कोटी रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी २०.९८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त असून मंजुर नियतव्ययाच्या ३० टक्के निधी ९४.५० कोटी रुपये शासनाकडून ४ ऑगस्टला प्राप्त झाला. निधीला प्रशासकीय मान्यता, निधी वितरण व खर्चाची प्रक्रिया सुरु आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत अनुसूचित जातीसाठी ७७ कोटी रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आला असून ५१.४९ लक्ष रुपये निधी वितरित व पूर्ण खर्च झाला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १४.०७ कोटी रुपये नियतव्यय मंजूर असून, ५७.१२ लक्ष रुपये निधी वितरित केला. त्यापैकी २५.५० लक्ष खर्च झाला आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांनी दिली.