महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला बहर आणणाऱ्या लोकसत्ताच्या ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेची नागपूर विभागीय प्राथमिक फेरी उद्या, गुरुवारी होत आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून यावर्षी नागपूर विभागातून सर्वात जास्त १५५ प्रवेशिका आल्या आहेत. त्यामुळे नागपूरबाहेरचे स्पर्धक गुरुवारी, तर नागपुरातील महाविद्यालयांचे स्पर्धक शुक्रवारी त्यांचे वक्तृत्व सादर करतील. ‘जनता सहकारी बँक पुणे’ व ‘तन्वी हर्बल’ प्रायोजक असलेल्या स्पर्धेची पहिली फेरी अमरावती मार्गावरील बोले पेट्रोल पंपाजवळच्या, विनोबा विचार केंद्रात सकाळी ८.३० वाजता होणार आहे. स्पर्धेस सिंहगड इन्स्टिटय़ूट, मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस, इंडियन ऑइल, इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अर्थात, आयसीडी यांचे सहकार्य लाभले आहे. युनिक अ‍ॅकेडमी आणि स्टडी सर्कल स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. प्राथमिक फेरीतून निवडण्यात आलेले वक्ते ४ फेब्रुवारीला होणाऱ्या विभागीय अंतिम फेरीत दाखल होतील. राज्यातून आठही विभागातून निवडण्यात आलेल्या वक्त्यांची महाअंतिम फेरी १४ फेब्रुवारीला मुंबई येथे रंगणार आहे.