नागपूर : जगभरात प्रसिद्ध असलेले डॉली चायवाला हे नागपूरमधील सिव्हिल लाईन्स परिसरात चहा विकणारे एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या चहा बनवण्याच्या अनोख्या शैलीमुळे आणि लक्षवेधी वेशभूषेमुळे ते सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध झाले आहेत. रंगीबेरंगी केस, स्टायलिश कपडे, मोठे गॉगल्स आणि रजनीकांतच्या अंदाजात चहा ओतणे ही त्यांची खास ओळख बनली आहे. ‘डॉली की टपरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या चहाच्या गाड्यावर रोज शेकडो ग्राहक येतात. युट्युबवर त्यांचा चॅनेल असून त्याला १३ लाखांहून अधिक सदस्य आहेत.
इंस्टाग्रामवरही त्यांचे लाखो फॉलोअर्स आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली, जेव्हा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स त्यांच्या टपरीवर चहा प्यायला आले. गेट्स यांनी स्वतः हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर डॉली चायवाला रातोरात चर्चेत आले. ते दररोज सुमारे ५०० ते ६०० कप चहा विकतात आणि महिन्याला अंदाजे दीड लाख रुपयांपर्यंत कमाई करतात. सोशल मीडियावर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्यांना विविध ब्रँड्ससोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
बिल गेट्स यांना चहा पाजल्यावर डॉली चायवाला यांचे जगभरात नाव झाले आणि त्यांनी दुबईसह जगभर दौरे देखील केले. बिल गेट्स यांच्या भेटीनंतर डॉली चायवाला इन्स्टाग्रामवर वेगाने लोकप्रिय झाला. काही दिवसातच त्याचे लाखो फॉलोअर्स तयार झाले. मात्र आता त्याचे इन्स्टाग्राम अकाउंटच बंद करण्यात आले.
लाखो फॉलोअर्स क्षणात गमावले
डॉली चायवाला हे मूळचे नागपूरचे असून गेली अनेक वर्षं ते सिव्हिल लाईन्स परिसरात “डॉली की टपरी” या नावाने चहा विक्री करत आहे. नागपूरचे प्रसिद्ध डॉली चायवालाने अलिकडेच आपल्या ‘डॉली की टपरी’ ब्रँडची फ्रँचायझी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. सोशल मीडियावर आपल्या हटके स्टाईल आणि चहा बनवण्याच्या खास पद्धतीमुळे प्रसिद्ध झालेल्या डॉली यांनी आपला व्यवसाय अधिक व्यावसायिक पद्धतीने विस्तारण्याची दिशा घेतली होती.
डॉलीने नव्या पाऊलाबाबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनच माहिती दिली होती. मात्र सोमवारी अचानकपणे डॉलीचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले. अकाउंट बंद केल्यामुळे डॉलीने लाखो फॉलोअर्स एका क्षणात गमावले. अकाउंट का बंद झाले याबाबत अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. इन्स्टाग्रामसह डॉलीकडूनही याबाबत माहिती दिली गेली नाही.