नागपूर : न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मे महिन्यात भारताचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेतली.सरन्यायाधीश गवई यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ तुलनात्मकदृष्ट्या अल्प असून, ते २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. या सहा महिन्यांच्या कार्यकाळातला बराच काळ सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी अवकाशातील आहे.
अंत्यंत कमी कालावधी लाभला असला तरी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यावर न्या.गवई सातत्याने दौरे करत आहेत आणि वेगाने निर्णय घेत आहे. मे महिन्याच्या अंतिम आठवड्यात न्या.गवईंनी कॉलेजियमची बैठक घेत सर्वोच्च न्यायालयात तसेच देशातील विविध उच्च न्यायालयात नव्या न्यायमूर्तींची शिफारस केली.या शिफारसीला लवकर मान्यता न दिल्यामुळे न्या.गवईंनी केंद्र शासनाला खडेबोलही सुनावले होते. यानंतर त्यांनी लंडनचा दौरा केला आणि पंतप्रेधान नरेंद्र मोदी यांच्यासह संविधानाचे महत्व यावर भाष्य केले. गवई यांनी १४ मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर केवळ काही आठवड्यांतच न्यायव्यवस्थेच्या इतिहासात मोलाची आणि मूलगामी सुधारणा घडवून आणल्या आहेत.
न्यायालयीन कार्यक्षमतेपासून ते पर्यावरणसंवर्धनापर्यंत विविध मुद्द्यांवर त्यांनी झपाट्याने निर्णय घेत न्यायसंस्थेला नवे वळण दिले आहे. दरम्यान, मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी प्रोटोकॉल पालन न केल्यामुळे मुख्य सचिवांसह अधिकाऱ्यांना ख़डसावले होते. अमरावती, नागपूर, छत्रपतीसंभाजीनगर, मुंबई मध्ये आयोजित कार्यक्रमात न्या.गवई यांनी विविध सत्कार सोहळ्यात सहभाग घेतला. अलिकडेच हैदराबादमध्ये एका विधी विद्यापीठाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यात त्यांनी न्यायव्यवस्थेत बदल करण्याबाबत मत व्यक्त केले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृतीत अचानक खालावल्याने विधी क्षेत्रात चिंतेचे वातावरण होते.
तब्येतीची स्थिती काय?
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शपथ घेतल्यानंतर हैदराबाद, मुंबई, नागपूर, लंडन व इटली आदी ठिकाणी दौरे करून विविध मंचांवर संविधान, न्यायव्यवस्था आणि सामाजिक न्याय यावर भाष्य केले. त्यांनी हैदराबादमध्ये न्यायप्रणालीतील प्रलंबित प्रकरणांचा मुद्दा उपस्थित केला, तर मुंबई विधानमंडळात भावनिक भाषण करत तीनही राज्यघटकांमध्ये परस्पर आदराची गरज व्यक्त केली. शपथ घेतल्यापासून सातत्याने दौरे करत असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम झाला. हैदराबादमधून परतल्यावर त्यांना दिल्ली येथील एका खासगी रुग्णालयात सोमवारी तातडीने भर्ती करण्यात आले. त्यांना हैदराबाद दौऱ्यावर संसर्ग झाल्यावर रुग्णालयात भर्ती करण्यात आले. रुग्णालयात भर्ती केल्यावर न्या.गवईंवर डॉक्टरांनी उपचार केले.
न्या.गवईंच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्या.गवईंनीही उपचाराला प्रतिसाद दिला आणि गुरुवारी रात्री उशीरा त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. न्या.गवई आता आपल्या निवासस्थानी असून येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात सहभागी होतील अशी माहिती आहे.