महापालिकेची आर्थिक स्थिती आधीच नाजूक असताना महिला बचत गट व्यवसायाचा अभ्यास करण्यासाठी नागपुरातील नगरसेविका तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर जाणार असून सध्या हा दौरा महापालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने २०१८ मध्ये महिला उद्योजिका मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात वर्षां ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत नुकतीच बैठक झाली. या बैठकीत नगरसेविकांच्या अभ्यास दौऱ्याच्या आयोजनावर चर्चा झाली. तेलंगणा राज्यात बचत गटांचा मोठय़ा प्रमाणात विस्तार झाला आहे. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी स्वतंत्र बाजारपेठ तेथे आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात महिलांना रोजगार मिळाला आहे. विशेष म्हणजे, सर्वच प्रकारच्या उत्पादनात तेथील बचत गटांनी बाजी मारली आहे.

नागपुरातही अशाच प्रकारचा उपक्रम राबवता येईल का, याची चाचपणी तसेच तेथील बचत गटांचा अभ्यास करण्यासाठी नागपुरातील सर्व ८२ नगरसेविका तेलंगणाच्या दौऱ्यांवर घेऊन जाण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीने घेतला आहे. या दौऱ्यांचा खर्च महापालिका करणार आहे. महापालिका आर्थिक डबघाईस आली असताना आणि निधी नसल्याने विकास कामांवर परिणाम होत असताना अभ्यास दौऱ्यावरील खर्च कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात हा दौरा असून तो तीन दिवसांचा आहे. या दरम्यान तेथे कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे.

नगरसेविका तेथील बचत गटाच्या कामाची पाहणी करून नागपुरातील बचत गटाच्या कामाला दिशा देणार आहे. समितीच्या सर्व नगरसेविकांना या संदर्भात पत्र पाठविले जाणार असून त्याचा होकार आल्यावर दौऱ्याचे नियोजन केले जाणार आहे.

मॉलचे केवळ भूमिपूजन

महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने जिल्हा परिषदेची शाळा असलेल्या बडकस चौकातील एका मोकळ्या भूखंडावर महिला बचत गट व्यापारी संकुल उभारले जाणार होते. जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांनी भूमिपूजनही केले होते. एका राजकीय नेत्याच्या मुलाने त्या ठिकाणी वाहनतळ सुरू केले आहे. या जागेवर व्यापारी संकुल केव्हा होणार, या प्रतीक्षेत महिला बचत गट गेल्या अनेक दिवसांपासून आशेने पहात असताना गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेचे त्याकडे दुर्लक्ष आहे.