नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालगतच्या गावांमधील गावकऱ्यांना दुचाकीवरुन जात असताना अचानक वाघ समोर येत असेल, तर अशा घटनांची सवय झाली आहे. वाघ समोर दिसताच ते थांबून जातात आणि मग वाघही निमुटपणे आपला रस्ता ओलांडतो. मोहर्ली, पदमापूर रस्त्यावर कित्येकदा गावकऱ्यांना या प्रसंगांचा सामना करावा लागतो. मात्र, महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पात कदाचित पहिल्यांदाच असा प्रसंग घडला. दोन दुचाकीस्वार रस्त्याने येत असताना अचानक वाघ समोर आला.

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पातील वाघिणीला तीन बछडे आहेत. या वाघिणीने बछड्यांना जन्म दिल्यापासून तिला जंगलाच्या आत फार कमी वेळा पाहिले गेले आहे. तर बरेचदा ती बाहेर पिपरीया, सिल्लारीकडे फिरताना आढळून आली आहे. ही वाघीण एकटीच नाही तर पिल्लांना घेऊन बाहेर फिरत असते. या मार्गावरुन दोन दुचाकीवरुन दोन कुटूंब येत होते. तर त्याचवेळी ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक संजय करकरे व त्यांच्या पत्नी संपदा करकरे हे बॅनियन ट्री फाउंडेशनच्यावतीने पेंचमधील कार्यक्रम आटपून त्यांच्या चारचाकी वाहनाने परतत होते. त्याचवेळी त्यांना या मार्गावरुन वाघ येत असल्याचे जाणवले. त्यांनी त्यांच्या वाहनाच्या काचेतूनच इशारा करत दुचाकीने येणाऱ्या त्या दोन्ही जोडप्यांना जागीच थांबवले. तर त्यांच्या मागाहून येणाऱ्या वाहनांना देखील त्यांनी थांबवले. लगेच त्यांनी त्यांच्या वाहनातून कॅमेरा काढला. अवघ्या काही सेकंदात वाघ रस्त्यावर आला.

कदाचित त्या वाघिणीच्या बछड्यांपैकीच तो एक असावा. रस्त्यावर येताच त्या वाघाने दोन्ही बाजूने नजर टाकली आणि काही क्षणातच रस्ता ओलांडत तो पलीकडे गेला. या व्याघ्रप्रकल्पालगतच्या गावांमधील गावकऱ्यांना अशा प्रसंगांची सवय नाही. दुचाकीने जाताना अचानक वाघ समोर आल्याने ते देखील घाबरले. समोरही जाता येईना आणि मागेही फिरता येईना, अशी त्यांची अवस्था होती. मात्र, करकरे दाम्पत्यांनी त्यांना आहे त्याच जागेवर थांबायला सांगितले आणि घडणारा प्रसंग टळला. ते दोन्ही दुचाकीचालक त्यांच्या कुटुंबासह होते. त्यामुळे वाहने आणि वाघ समोरासमोर आले असते तर काय घडले असते? मात्र, हा प्रसंग घडताघडता थांबला आणि पुढे घडणारी घटना देखील टळली. या मार्गावर इतर प्राणी पाहीले आहेत, पण वाघ पहिल्यांदाच दिसून आल्याचे संजय करकरे यांनी सांगितले. ताडोबालगतच्या गावातील लोकांना सवय आहे, पण पेंचमध्ये कदाचित पहिल्यांदाच दूचाकीसमोर वाघ आला असावा.