नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पहिली यंत्र मानवाद्वारे (रोबोटिक) मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. यात रोबोटिक पद्धतीने दानदात्याचे मूत्रपिंड काढून गरजू रुग्णाला लावण्यात आले. देशात या प्रकारची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा मेडिकल प्रशासनाचा दावा आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या संयुक्त प्रयत्नाने झालेल्या प्रत्यारोपणात ६३ वर्षीय महिलेने ३८ वर्षीय मुलाला मूत्रपिंड दान देऊन नवे आयुष्य दिले. या रुग्णावर सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णाची प्रकृती खालावत असल्याने त्याला मूत्रपिंड प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता. रुग्णाच्या आईने मुलाला मूत्रपिंड देण्याची तयारी दर्शवली. यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. रोबोटिक पद्धतीने प्रत्यारोपण केल्यास दानदात्याला कमी वेदना व कमी रक्तस्त्राव होत असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी रोबोटिक मूत्रपिंड प्रत्यारोपणाला हिरवा कंदील दिला. नातेवाईकाच्या संमतीने ३० जुलैला मेडिकलच्या शल्यक्रिया गृहात रोबोटिक मूत्रपिंड प्रत्यारोपण पार पडले.

४८ तासानंतर दानदाती महिलेला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाच्या प्रकृतीतही झपाट्याने सुधारणा होत आहे, असे मेडिकल रुग्णालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सांगितले. याप्रसंगी यशस्वी प्रत्यारोपणात महत्त्वाची जबाबदारी असलेले डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. वंदना आदमने, डॉ. भूपेश तिरपुडे, डॉ. गायत्री, डॉ. सुमित चाहकर, डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह इतरही डॉक्टर उपस्थित होते. दरम्यान देशातील निवडक नावाजलेल्या रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया युनिट आहे. त्यात नागपुरातील मेडिकल रुग्णालय हे देशातील रोबोटिक शस्त्रक्रिया युनिट असलेले पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. या शस्त्रक्रियेमुळे मेडिकल हे रोबोटिक मूत्रपिंड शस्त्रक्रिया करणारे देशातील पहिले रुग्णालय असल्याचेही डॉ. राज गजभिये यांनी सांगितले.

शस्त्रक्रियेत वेदना, रक्तस्त्राव कमी

पारंपरिक मूत्रपिंड शस्त्रक्रिया करताना शरीराला चिरा मारून मूत्रपिंड काढले जाते. यात दानदात्याला वेदना, रक्तस्त्रावासह इतरही धोके संभावतात. रोबोटिकद्वारे मूत्रपिंड काढताना तीन लहान छिद्र करून शरीरातून मूत्रपिंड काढण्यात येते. त्यामुळे रुग्णाला वेदना, रक्तस्त्राव कमी होतो व प्रकृतीत सुधारणा लवकर होते, असे मेडिकलच्या नेफ्रोलाॅजी विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय सेलुकर यांनी सांगितले. रोबोटिक मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तीन महिन्यांपासून संपूर्ण चमूने प्रशिक्षण घेतल्याचीही माहिती त्यांनी दिली.