नागपूर : आशियाई सिंहगणनेला शनिवारी गुजरातमध्ये सुरुवात झाली. २०१५ नंतर होणारी ही पहिलीच तर आतापर्यंतची सोळावी क्षेत्रीय आशियाई सिंहगणना आहे. ११ जिल्ह्यांमध्ये केल्या जाणाऱ्या या गणनेत ‘डायरेक्ट बीट व्हेरिफिकेशन’ ही पद्धत वापरली जात आहे. जागतिक वन्यजीव दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मंडळाचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यात सिंहगणना करणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी केंद्र सरकारने सिंहांच्या संवर्धनासाठी दोन हजार ९०० कोटींहून जास्त निधी मंजूर केला. सध्या गुजरातमधील नऊ जिल्ह्यांमधील ५३ तालुक्यांमध्ये सुमारे ३० हजार चौरस किलोमीटर परिघात आशियाई सिंहांचे वास्तव्य आहे.

सिंहगणनेचा पहिला टप्पा दहा आणि ११ मे रोजी, तर अंतिम टप्पा १२ आणि १३ मे रोजी पार पडणार आहे. जुनागढ, गिर सोमनाथ, भावनगर, राजकोट, मोरबी, सुरेंद्रनगर, देवभूमी द्वारका, जामनगर, अमरेली, पोरबंदर आणि बोटाड यासह ५८ तालुक्यांमध्ये ही गणना होणार आहे. शेवटची गणना २०१५ साली झाली होती. त्यावेळी ५२३ सिंहांची नोंद करण्यात आली. दर पाच वर्षांनी होणारी ही गणना २०२० मध्ये करोना प्रादुर्भावामुळे होऊ शकली नाही. मात्र, ‘पूनम अवलोकन’ पद्धतीचा म्हणजेच पूर्ण चंद्र निरीक्षणातून ६७४ ही संख्या निश्चित करण्यात आली. शनिवारपासून सुरू झालेल्या आशियाई सिंहगणनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. यात उच्च-क्षमतेचे कॅमेरे, कॅमेरा ट्रॅप, प्रत्यक्ष वेळेचा मागोवा घेण्यासाठी रेडिओ कॉलर, त्या जागेवरील जीपीएस-आधारित तपशील नोंदवण्यासाठी ई-गुजफॉरेस्ट मोबाइल ॲप तसेच तपशीलवार अधिवास आणि हालचाली नकाशे तयार करण्यासाठी जीआयएस सॉफ्टवेअर समाविष्ट आहे.

‘डायरेक्ट बीट व्हेरिफिकेशन’ म्हणजे काय?

डायरेक्ट बीट व्हेरिफिकेशन’ ही पद्धत तीन दशकांहून अधिक काळापासून ‘ जंगले, गवताळ प्रदेश, किनारी क्षेत्रे आणि महसुली जमिनी अशा विविध भूभागांमध्ये विशेषतः प्रभावी आहे. संपूर्ण प्रदेश विभाग, उपविभाग यात विभागला जातो. यात सिंहांचे दर्शन, हालचालीची दिशा, वय, लिंग आणि गट गतिशीलता यासह पद्धतशीर स्वरूपात क्षेत्रीय निरीक्षणे नोंदवण्यासाठी प्रत्येकी एक चमू असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारी निवेदनात काय?

सरकारी निवेदनात म्हटले आहे की, “मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली आणि वनमंत्री मुलू बेरा आणि राज्यमंत्री मुकेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली, वनविभागाने सिंहांच्या संवर्धन आणि अधिवास विस्ताराचे प्रयत्न तीव्र केले आहेत, ज्यामुळे संख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे.