नागपूर : नागपुरातील अशोक चौकात एक विचित्र दृश्य पाहायला मिळत आहे. ते पाहून नागपूरकरांवरही थक्क होण्याची वेळ आली आहे. सध्या बांधकामाधिन असलेल्या इंदोरा -दिघोरी उड्डाण पुलाच्या रस्त्याचा बाह्यभाग अशोक चौकात थेट रस्त्या लगतच्या इमारतीच्या बाल्कनीतून गेला आहे.नागपुरात ९९८ कोटी रुपये खर्च करून इंदोरा ते दिघोरी या दोन टोकांना जोडणारा उड्डाण पुल बांधला जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा पुल ग्रेटनाग रोडवरील अशोक चौकातून सक्करदऱ्याकडे जातो.
या चौकातून चार दिशांना उड्डाण पुलाचे रस्ते जात आहे. येथील एक व्हीडीओ व्हायरल झाला असून तो सध्या नागपूरमध्ये चर्चेचा विषष ठरला आहे. उड्डाण पुलाचा एका मार्गाचा बाह्यभाग रस्त्यालगत असलेल्या एका इमारतीच्या बाल्कणीतून जात आहे. इमारत मालकाने अनधिकत बांधकाम केल्याने ही स्थिती उद्भवल्याचा दावा महापालिकेने केला आहे. ते त्यांना पाडावे लागणार आहे. पुलाच्या बांधकामापूर्वीच ही इमारत बांधण्यात आली होती. वाढीव बांधकाम करताना त्याचा नकाशा महापालिकेकडून मंजूर करून घेण्यात आला नव्हता. त्यामुळे ज्यावेळी पुलाच्या बांधकामाचा आराखडा तयार करण्यात आला त्यावेळी ही बाब लक्षात आली नाही. आता पुलाचे बांमधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.
सक्करदराकडे जाणाऱ्या पुलाच्या मार्गाचा बाह्यभाग हा संबंधित इमारतीच्या बाल्कनीतून गेला आहे. हे दृश्य पाहण्यासाठी मुळ रस्त्यावरून जाणारे-येणारे थांबतात. बांधकामाच्या नव्या पद्धतीबाबत चर्चा करतात. दरम्यान प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित इमारत मालकास त्याने केलेले अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावली आहे. महापालिकेलाही याबाबत पत्र देऊन अतिक्रमण काढण्याची सूचना करण्यात आली आहे. सध्या तरी मात्र ते तसेच आहे. बाल्कनीतून उड्डाण पुल गेल्याचे दृश्य कायम आहे. याचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने त्याची चांगलीच चर्चा होत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्र्यांच्या शहरात विचित्र प्रकार घडल्याने चर्चेला अधिक ऊत आला आहे.