नागपूर : स्कूलबस, स्कूलव्हॅनची ‘योग्य’ तपासणीच नाही, अपघाताची टांगती तलवार कायम

नागपूरच्या शहर आणि पूर्व नागपूर ‘आरटीओ’ कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या स्कूलबस आणि स्कूलव्हॅनपैकी २५ ते ३० टक्के वाहनांची योग्यता तपासणीच झाली नसल्याची धक्कादायक माहिती आहे.

नागपूर : स्कूलबस, स्कूलव्हॅनची ‘योग्य’ तपासणीच नाही, अपघाताची टांगती तलवार कायम
विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक

नागपूर : नागपूरच्या शहर आणि पूर्व नागपूर ‘आरटीओ’ कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या स्कूलबस आणि स्कूलव्हॅनपैकी २५ ते ३० टक्के वाहनांची योग्यता तपासणीच झाली नसल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे येथील शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होणार कशी? हा प्रश्न अनुत्तरित आहे. बेसा-घोगली मार्गावर सोमवारी स्कूलव्हॅन उलटून ४ मुले जखमी झाली होती. या वाहनाचेही योग्यता प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

उपराजधानीतील शहर ‘आरटीओ’ आणि पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारित सुमारे १ हजार ३०० स्कूलबस आणि स्कूलव्हॅन येतात. करोना काळातील प्रथम कडक टाळेबंदी व त्यानंतर ऑनलाईन वर्गामुळे या स्कूलबस, स्कूलव्हॅन चालकांची आर्थिक कोंडी झाली. बसेस बंद असल्याने अनेकांना वाहन विक्री करणे वा त्यात भाजीपाल्याचा व्यवसायही करावा लागला. दरम्यान, नियमित शाळा सुरू झाल्याने हळूहळू स्कूलबस, स्कूलव्हॅन पुन्हा रस्त्यांवर धावत आहे.

आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनेक चालकांना वाहनांचा परवानासह योग्यता तपासणीशी संबंधित शुल्क भरणे शक्य होत नाही. त्यामुळे वाहनचालक ‘आरटीओ’त योग्यता तपासणीसाठी टाळाटाळ करतात.

मध्यंतरी परिवहन आयुक्त कार्यालयाच्या सूचनेवरील नागपूर शहर व पूर्व नागपूर ‘आरटीओ’ कार्यालयाने स्कूलबस, स्कूलव्हॅनची तपासणी मोहीम राबवली. त्यात मोठ्या संख्येने वाहनांवर कारवाई केली गेली. त्यानंतर योग्यता तपासणीचे प्रमाण वाढले. परंतु, अद्यापही शहरी भागातील २५ ते ३० टक्के स्कूलबस, स्कूलव्हॅनची योग्यता तपासणी झाली नाही. त्यामुळे या वाहनांमध्ये काही दोष असल्यास व त्याचा अपघात झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

दरम्यान, ‘आरटीओ’ कार्यालयांनी २६ जुलै ते ३१ जुलै दरम्यान शहर व पूर्व नागपूर ‘आरटीओ’ कार्यालय परिसरात स्कूलबस, स्कूलव्हॅनची तपासणी मोहीम राबवली. त्यात शहरात १७ वाहनांत वैध योग्यता प्रमाणपत्र नसणे, १२ वाहनांत वैध विमा प्रमाणपत्र नसणे यासह इतरही काही वाहनांत दोष आढळले. तर पूर्व नागपुरात ९ वाहनांत वैध योग्यता प्रमाणपत्र नसणे, ७ वाहनांत वैध विमा प्रमाणपत्र नसणे यासह काही वाहनांत इतरही दोष आढळले. त्यानंतरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘आरटीओ’ने आता एक स्थायी फिरते पथक स्कूलबस, स्कूलव्हॅन तपासणीसाठी नियुक्त केले आहे. ‘आरटीओ’कडून कारवाई केली जाईलच. परंतु, नागरिकांनीही नियम मोडणाऱ्या वाहनांत मुलांना पाठवू नये, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur inspection buses school vans hanging sword accidents remains ysh

Next Story
महिलेला धमकावून बलात्कार करणारा अटकेत; समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी