नागपूर: भारताची विज्ञानाधिष्ठीत प्रतिमा उजळवणारा आणि खगोल शास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वत्र त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. नागपूरशी नारळीकरांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांनी शहरातील अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली आहे. १९८० मध्ये त्यांनी शासकीय विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.
त्यानंतर अलिकडच्या काळात श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील इन्स्पायर कार्यक्रामात त्यांनी भाग घेतला होता. परंतु, त्यांचा नागपूर दौरा अनेकांना लक्षात आहे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याचा क्षण. २९ ऑगस्ट २०१५ ला डॉ. नारळीकर यांनी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्या केलेले भाषण आजही सर्वांना लक्षात आहे.
डॉ. नारळीकरणांनी त्यावेळी केलेल्या भाषणाची प्रत आणि छायाचित्रे लोकसत्ताकडे असून ते भाषण सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. ते पुढीलप्रमाणे, आज मला आठवते की लहानपणी आमच्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या प्रशस्त निवासस्थानात बरीच मोठी माणसे पाहुणे म्हणून किंवा जाता जाता चर्चेसाठी म्हणून येऊन जात. माझ्या वडिलांचे वाचन अफाट आणि गणिती व वैज्ञानिक असूनही विविध धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य अशा विषयांना पण गवसणी घालणारे होते.
अशा पार्श्वभूमीवर अनपेक्षितरित्या ७-८ लोकांचा एक ग्रुप आमच्या घरी आला. त्यांना माझ्या वडिलांना भेटायचे होते. ग्रुपच्या प्रमुखांचे नाव होते तुकडोजी महाराज. माझ्या वडिलांना ते प्रथमच भेटत होते पण त्यांची चर्चा रंगली. अर्थात् चर्चेचे विषय माझ्या विचारविश्वाच्या पलिकडले होते तरी चर्चा रंगली हे मला कळू शकले. पुढे तुकडोजी महाराजांनी त्यांचे काही साहित्य माझ्या वडिलांना दिले ज्यातील विचार माझ्या आकलनाला देखील पटणारे होते. म्हणून आज राष्ट्रसंतांचे नाव असलेल्या ह्या विद्यापीठात आजच्या मंगल प्रसंगी काही विचार मांडायची संधी मिळते आहे याचा मला अभिमान वाटतो.
प्रथम एका काल्पनिक कालयानात बसून आपण भारतातच भूतकाळात जाऊन एका स्नातकाची हकीकत पाहू, महाकवि कालिदासाने रघुवंशातल्या पाचव्या सर्गात सांगितलेली कौत्स ह्या स्नातकाची ती गोष्ट. आपल्या गुरूकडून, वरतन्तुकडून विद्यार्जन करून कौत्स रघूराजाकडे येतो. त्याचे स्वागत आणि विचारपूस करूनं रघू त्याच्या येण्याचे प्रयोजन विचारतो. “आपणासारख्या पूज्य व्यक्तीच्या केवळ आगमनानेच माझे मन तृप्त झाले नाही. मला आपली काहीतरी सेवा करायची आहे. आपण वनातून माझ्याकडे येण्याची कृपा केलीत ती आपल्या गुरूच्या आज्ञेने का स्वतःच्या इच्छेने हे जाणण्याची उत्सुकता आहे.” कौत्स त्याला आपल्या येण्याचे प्रयोजन सांगतो. विद्यादान पूर्ण झाल्यावर ‘‘मी आपणाला काय गुरूदक्षिणा देऊ” असे विचारता कौत्साला त्याच्या गुरूने सांगितले ‘तू माझी निरंतर भक्तिभावाने केलेली सेवा हीच गुरूदक्षिणा… मला आणखी काही अपेक्षा नाही. परंतु कौत्साचे समाधान न होऊन त्याने काही तरी देण्याचा आग्रहच धरला तेव्हा संतापून वरतन्तूने प्रत्येक शिकवलेल्या विद्येसाठी एक कोटी अशा तऱ्हेने चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणायला सांगितल्या.
इतकी धनराशी एकदम कुठून आणणार ?’ रघूची दानशूरता सुप्रसिद्ध असल्याने कौत्स त्याच्याकडे मदत मागण्यासाठी येतो. परंतु रघूने विश्वजित यज्ञात सर्व काही दान करून टाकले असल्याने मातीच्या भांड्याने कौत्साची पूजा-अर्चना केलेली असते. तेव्हा ह्या निर्धन दात्याकडून आपली अपेक्षापूर्ती होणार नाही असे वाटून कौत्स म्हणतो… ‘‘गुरूसाठी म्हणून मला हवी असलेली गोष्ट आता मी दुसऱ्या कोणाकडून मागेन. कारण पाणी संपून गेलेल्या शरदाच्या मेघाकडून चातक देखील याचना करीत नाही.’’ मात्र, रघू कौत्साला रिक्त हस्ताने जाऊ देत नाही. पृथ्वी जिंकून झाली असल्याने त्याला हवी असलेली धनराशी कुबेराकडून आणायला तो स्वारीची तयारी करतो.
परंतु सकाळी त्याला कळते की, रात्री कुबेराने सुवर्णवृष्टी करून रघूच्या हल्ल्याची आवश्यकताच नाहीशी केली. तो सोन्याचा ढीग चौदा कोटी सुवर्णमुद्रांहून जास्त होता, तरी सर्वच्या सर्व रघूने कौत्साला देऊ केला. परंतु कौत्साने त्यातून गुरूदक्षिणेपुरताच भाग उचलला. ह्या आख्यानात आपल्याला अनेक आदर्श पहायला मिळतात. प्रथम कौत्सासारख्या नव्या तरुण स्नातकाला राजदरबारी मिळालेला मान. नंतर, वरतन्तूची विद्यार्थ्यांकडून गुरुसेवेव्यतिरिक्त गुरूदक्षिणेची अपेक्षा नसणे, हा दुसरा आदर्श. (अत्याग्रहामुळे त्याने रागावून भरमसाठ गुरूदक्षिणा मागितली हा भाग वेगळा!) स्वतःचा खजिना रिता असूनही याचकाने रिक्तहस्ताने परत जाऊ नये ह्यासाठी रघूची स्वर्गापर्यंत स्वारीची तयारी हा दातृत्वाचा आदर्श, आणि रघूच्या शौर्याचा दबदबा असा की, कुबेराने युद्ध टाळण्यासाठी त्याची रास्त अपेक्षा पुरी करावी. शेवटी, कुबेराने दिलेल्या संपत्तीचा अपेक्षेपेक्षा जास्त भाग कौत्स आणि रघू दोघांनाही नको होता हा निर्लोभीपणाचा एक आदर्श.
आजच्या शिक्षण आणि राजकीय क्षेत्रात हे आख्यान कसे असेल ? वरतन्तूच्या महाविद्यालयाच्या जबरदस्त कॅपिटेशन फीसाठी अर्थसहाय्य मागायला आलेल्या कौत्साची दाद मंत्रालयात लागेल का? आणि वशिला लावून दाद लागली तरी राज्य शासनाचा पैसा संपला असल्याने अनुदान देता येत नाही हे उत्तर त्याला नोकरशहांकडून मिळेल. त्यावर मात करून त्याने मुख्यमंत्री रघूरावजींकडे मजल मारलीच तर मुख्यमंत्र्यांना त्यासाठी केंद्राकडून पैसे आणायची इच्छा होईल का? आणि झालीच तर त्यांचा केंद्र शासनात इतका दबदबा असेल का की, मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत ठाण मांडण्यापूर्वीच वित्तमंत्री कुबेरनाथ मागितलेल्या अर्थसहाय्यापेक्षा जास्तच अनुदान ताबडतोब पाठवतील ? शेवटी, गरजेपेक्षा जास्त अनुदान नाकारण्याची सचोटी कोण दाखवू शकेल ? आजच्या प्रसंगी हा विरोधाभास दाखवण्यामागे माझा हेतू असा.
पुराणकाळी समाजात, राजदरबारी आणि देवांकडे सुद्धा विद्वान माणसाचा आदर होत असे. “विद्वान सर्वत्र पूज्यते” हे वाक्य आपणाला त्या परिस्थितीची आठवण करून देते. आज आपल्या देशात तशी परिस्थिती नाही हे कोणीही कबूल करेल. विद्येच्या अलंकारापेक्षा पैसा, अधिकार मोठे मानले जातात. असे का व्हावे ? त्याकरिता आपल्याला नाण्याची दुसरी बाजू पहायला पाहिजे. काही थोडे अपवाद सोडल्यास आपल्या आजच्या विद्वानांची प्रतिमा अशी आहे का की, समाजाने त्यांना मान द्यावा ? विद्येसाठी सतत झटणे, विद्यादान करण्यात आनंद मानणे, उत्कृष्टतेची कदर करणे आणि धन-सन्मानांबद्दल निस्पृह असणे हे गुण आजच्या किती विद्वानांत सापडतात ? राजकारणापासून भारतातले कुठलेही विद्यापीठ मुक्त नाही ही वस्तुस्थिती आहे. विद्यापीठांचे क्षेत्र ओलांडून विविध राष्ट्रीय संशोधन संस्थांकडे पाहिले तर तिथे शासकीय क्षेत्रातली अधिकारशाही, लालफीत, आत्मसंतुष्ट वृत्ती आणि निष्क्रियता दिसून येतात. साहजिकच गुरूजनांचा हा आदर्श पाहिला की विद्यार्थी देखील तोच कित्ता गिरवू पाहतात.
कोणी म्हणेल की, रघू आणि कौत्साचे आख्यान त्रेतायुगातले होते. आज कलियुग आहे तेव्हा हे असेच चालायचे. मला हे पटत नाही. आजच्या स्नातकांपुढे मला आवर्जून सांगावेसे वाटते की, सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे अवाहन डॉ. नारळीकर यांनी केले होते.