नागपूर : जावयाकडून सासू-सासऱ्यांची हत्या ; पत्नी व सावत्र मुलीवरही हल्ला

पती-पत्नीत किरकोळ कारणावरून झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सासू-सासऱ्यांची जावयाने कुऱ्हाडीने घाव घालून त्यांची हत्या केली.

CRIME
(प्रातिनिधिक छायाचित्र)

निलडोहमधील मध्यरात्रीचा थरार

पती-पत्नीत किरकोळ कारणावरून झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सासू-सासऱ्यांची जावयाने कुऱ्हाडीने घाव घालून त्यांची हत्या केली. त्यानंतर पत्नी व सावत्र मुलीवरही हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघीही थोडक्यात बचावल्या. ही थरारक घटना शनिवारी रात्री एक वाजता निलडोह ग्रामपंचायतमधील अमरनगरात घडली.

पुष्पा भगवान रेवारे (६०, अमरनगर) आणि भगवान बाळकृष्ण रेवारे (६५) अशी मृतांची नावे आहेत. कल्पना नरमू यादव (४०), मुस्कान (१३) अशी जखमी मायलेकींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नरमू सीता यादव (४५) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान रेवारे हे पत्नी पुष्पा आणि मुलगी कल्पना यांच्यासह शेळीपालनाचा व्यवसाय करतात. २०११ मध्ये कल्पनाचा संतलाल मंडलीय सोबत विवाह झाला होता. ते निलडोह येथे राहात होते. त्यांना एक मुलगी आहे. कालांतराने संतलाल कल्पनाला सोडून गेला. त्यामुळे ती मुलीसह आईवडिलांकडे राहायला आली. २०१३ मध्ये कल्पनाने नरमू यादव (४०) सोबत प्रेमविवाह केला. नरमू कल्पनाच्याच आईवडिलांकडे राहायला लागला. दोघांना महेंद्र नावाचा आठ वर्षांचा मुलगा आहे. कल्पनाला पहिल्या पतीपासून झालेली मुलगी मुस्कान त्यांच्या सोबतच राहात होती. त्यांचा संसार व्यवस्थित सुरू असताना नरमूला दारूचे व्यसन लागले. तो काही दिवसांपासून काम करीत नव्हता. दारू पिण्यासाठी पत्नीला पैसे मागून मारहाण करीत होता. शनिवारी नरमू दारू पिऊन घरी आला.

त्यावेळी सासू-सासरे आणि मुलगी एका खालीत झोपले होते. दुसऱ्या खोलीत पत्नी व मुलगा झोपला होता. त्याने कल्पना हिला झोपेतून उठवले आणि दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. तसेच घर नावावर करून देण्यासाठी दबाव टाकला. तिने नकार देताच तिला मारहाण करायला लागला. मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने पुष्पा आणि भगवान रेवारे हे धावत आले. नरमूने बाजूला पडलेल्या कुऱ्हाडीने दोघांवर घाव घालून त्यांना ठार केले. त्यानंतर सावत्र मुलगी मुस्कान व पत्नी कल्पनावरही कुऱ्हाडीने वार केले व पळून गेला. शेजाऱ्यांनी जखमी कल्पना आणि मुस्कान यांना लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. कल्पनाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी नरमू यादवला अटक केली.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur killed attacked wife stepdaughter midnight nildoh police arrested amy

Next Story
गडचिरोली : वाघाशी झालेल्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू
फोटो गॅलरी