scorecardresearch

नागपूर : बिबट्याच्या पिल्लाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू

पंचनामा करुन गोरेवाडा प्रकल्पातील वन्यप्राणी बचाव केंद्रात शवविच्छेदनासाठी आणले

नागपूर : बिबट्याच्या पिल्लाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू
(संग्रहीत छायाचित्र)

बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या बाहेरील मोकळ्या वनक्षेत्रातील नाल्यात आज (सोमवार) बिबट्याचे दोन ते तीन दिवसाचे पिल्लू पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळले. त्याचा पंचनामा करुन गोरेवाडा प्रकल्पातील वन्यप्राणी बचाव केंद्रात शवविच्छेदनासाठी आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुजीत कोलंगथ, डॉ. मयूर पावशे यांनी शवविच्छेदन केले. त्यात पिलाचा मृत्यू बुडून झाल्याचे स्पष्ट झाले.

गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक शतनिक भागवत, सहाय्यक वनसंरक्षक विजय सूर्यवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी नीलय भोगे, वनपाल सुरेश चाटे, वनरक्षक लता मांढळकर, वनमजूर राजन वासनिक यांच्या उपस्थितीत बिबट्याच्या पिलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाचे प्रतिनिधी म्हणून अजिंक्य भटकर व मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी म्हणून कुंदन हाते उपस्थित होते.

प्रकल्पाच्या वनक्षेत्रात काही बिबट्यांचा वावर –

प्राणीसंग्रहालयाचे कुंपण सुरक्षित असून आतून बिबट अथवा कोणही वन्यप्राणी बाहेर येऊ शकत नाही. मात्र, प्रकल्पाच्या वनक्षेत्रात काही बिबट्यांचा वावर असल्याने त्यातीलच एखाद्या मादी बिबटचे पिल्लू असावे, असे गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक शतनिक भागवत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.