नागपूर: भारतासह जगातील अनेक देशात आजही अवयव दान करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना प्राण गमावावे लागतात. मुळात नागपूरकर असलेले व येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) शिकलेल्या डॉ. अभय पांडे यांच्याकडून संयुक्त अरब अमिरात (यू. ए. ई.) येथेही नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी अवयवदानव जनजागृतीसाठी पुढाकार घेतला जात आहे. भारतीय व्यवसाय आणि व्यवसायिक परिषद (आय. बी. पी. सी.), दुबईद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
युरोपीयन देशांत अवयवदानाचा दर १० लाखांत ४० असला तरी भारतात ०.०१ टक्काच आहे. भारताला दरवर्षी ३० हजार यकृताची गरज असली तरी १५०० यकृतांचेच दान होते. देशात वर्षाला १५ ते २५ लाख लाख नेत्राची गरज असून ६८ हजारच नेत्रदानासाठी मिळते. अडीच लाख मूत्रपिंडाची गरज असताना केवळ ७ हजार मिळतात. ही तफावत पाहिली तर युरोपीनयन देशांच्या तुलनेत भारत अवयवदानात खूप मागे दिसतो. दरम्यान जगातील इतरही काही देशात स्थिती वेगळी नाही. याही देशांमध्ये अवयवदानाची संख्या कमी आहे. ही वाढवण्यासाठी भारतासह जगातील बऱ्याच देशात सातत्याने प्रयत्न होतात.
दरम्यान डॉ. अभय पांडे यांच्याकडूनही अवयवदानासाठी भारताबाहेरही जनजागृती केली जाते. डॉ. अभय पांडे यांनी नागपुरातील मेडिकलमधू एमबीबीएसचे शिक्षण घेत ह्रदयरोग विषयात डीएम केले आहे. जिनेव्हा, स्वीत्झर्लंडमध्ये त्यांनी डीएमकरून जगातील नावाजलेल्या भागात शिक्षणासह सेवाही देत आहे. डॉ. पांडे यांनी पुढाकार घेत २२ ऑक्टोंबरला दुपारी ५.३० वाजता अवयवदान जनजागृतीसाठी डबल ट्री बाय हिल्टन, एम. स्वेअर, बर दुबई येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यात प्रमुख पाहूणे म्हणून एमओएच यूएईच्या राष्ट्रिय प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष अली अब्दुल करीम अल ओबेदली, एमओएचएपीचे वैद्यकीय सल्लागार डॉ. ओमर अल जबरी उपस्थित राहतील. तर कार्यक्रमाला आमंत्रित म्हणून यूएईच्या आरोग्य आणि प्रतिबंध मंत्रालयाच्या मानवी अवयव आणि ऊतकांच्या देणगी आणि प्रत्यारोपणसाठीच्या राष्ट्रीय नियामक केंद्राचे संचालक डॉ. मारिया गोेझ उपस्थित राहतील. तर पॅनल सदस्य म्हणून पी. व्ही. शेहीन आणि डॉ. अभय पांडे उपस्थित राहणार असल्याचेही आयोजकांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.