बांधकामासाठी पदपथांवर संक्रांत; वर्धा मार्गावरील कोंडीही वाढणार
वर्धा मार्गावर बांधकामाधीन असलेला मेट्रो रेल्वेचा डबल डेकर पूल नोव्हेंबपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मात्र, पुलाच्या बांधकामासाठी वर्धा मार्गावर लोखंडी कठडे लावण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडीत भर पडण्याची शक्यता आहे.
वर्धा मार्गावर आत्ताच नागरिक तेथील वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. आता पुन्हा रस्त्यावर लोखंडी कठडे लावण्यात येणार आहे. डबल डेकरवर सहा मीटर सेगमेट लावण्यासाठी साईडिंग लावावी लागणार आहे. तब्बल महिनाभर हे काम सुरू राहील त्यासाठी रस्ते रुंद करावे लागणार आहे. यासाठी पदपथ तोडावे लागतील. असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या एक मीटर पदपथ तोडून पुलाखालील रस्ता रुंद केला जात आहे. मट्रोमार्ग आणि पुलाचे काम नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल. यात सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन आदीचा समावेश आहे. रस्ता विस्तारीकरणात पदपथ तोडण्यात येणार असल्याने येथून पादचाऱ्यांना जाण्यासाठी जागा उरणार नाही. त्याना पर्यायी व्यवस्था करण्याचा विचार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.मेट्रोचे प्रकल्प संचालक देवेंद्र रामटेककर म्हणाले की, डबल डेकरवरील रस्ता हा १९ मीटर रुंद असेल. पिल्लरसाठी जाणारी तीन मीटरची जागा सोडली तर दोन्ही बाजूने अंदाजे ७.५ मीटर रस्ता तयार केला जाईल. चार पदरी रस्ता उज्ज्वल नगरजवळ सहापदरी होईल. मेट्रो व्यवस्थापनाने प्रवाशांना सायकल उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात खापरी ते अजनी या दरम्यान सायकल ट्रॅक तयार करण्यासाठी लागणारी जागा महापालिकेने अधिग्रहीत करावी, असे महामेट्रोला वाटते.हिंगणा ते सीताबर्डी, सीताबर्डी ते धरमपेठ सायन्स मार्गावर पदपथ पादचाऱ्यांना चालण्यायोग्य नाही. ते अनेक ठिकाणी तुटले आहे. त्याला एकसंघ करण्याचे नियोजन महामेट्रोने केले आहे. पदपथाच्या बाजूला सुरक्षा भिंतही बांधण्यात येणार आहे.
क्रेझी केसलचे नियंत्रण मेट्रोकडे
मेट्रो प्रकल्पासाठी क्रेझी केसलच्या जागेची गरज आहे. क्रेझी केसलने त्यासाठी मोठय़ा रक्कमेची मागणी केली आहे. सध्या यातून तोडगा निघाला नाही. मात्र, मेट्रोकडेच क्रेझी केसलचे नियंत्रण दिले तर यातून मार्ग निघू शकतो, असे ब्रिजेश दीक्षित म्हणाले. यासंदर्भात अंतिम निर्णय एनआयटी, महामेट्रो आणि क्रेझी केसलचे संचालक यांच्या बैठकीतच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.