अर्थसंकल्पात तरतूद; शहरालगतच्या गावापर्यंत सेवा
नागपूर : नागपूर मेट्रोच्या टप्पा २ या विस्तारित प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ५ हजार ९७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून मेट्रोसेवेचा विस्तार शहरालगतच्या हिंगणा, बुटीबोरी, कामठी, कन्हान आणि ट्रान्सपोर्टनगरपर्यंत करण्यात येणार आहे.
मेट्रोचा दुसरा टप्प्पा एकूण ६७०८ कोटींचा असून त्यात ३२ स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो-१ चे हे विस्तारित स्वरूप आहे. मेट्रो-१ हा ८,६८० कोटींचा प्रकल्प असून तो ३८ किलोमीटरचा आहे. सध्या त्यातील वर्धा (१३.५ किमी.) आणि हिंगणा मार्गावरील (११ किमी.) मार्गावर वाहतूक सुरू झाली आहे. कामठी आणि पारडी या दोन मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून या वर्षाअखेर ते पूर्ण केले जाईल, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.
मेट्रो-२ मध्ये वरील चारही मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. त्यानुसार कामठी मार्गावर आटोमोटिव्ह चौक ते कन्हान दरम्यान १३ कि. मी.पर्यंत. त्यावर पिवळी नदी, खसारा फाटा, खैरी फाटा, लोकविहार, लेखानगर, कॅन्टोन्मेंट, कामठी पोलीस स्टेशन, कामठी नगर परिषद, ड्रॅगन पॅलेस, गोल्फ क्लब, कन्हान नदी ही स्थानके असेल. पश्चिमेकडे खापरी ते बुटीबोरी दरम्यान १८.७ कि. मी.पर्यंत. या मार्गावर ईको पार्क, अशोकवन, डोंगरगाव, मोहगांव, मेघदूत सिडको, बुटीबोरी पोलीस स्टेशन, म्हाडा कॉलनी, एमआयडीसी ही स्थानके असेल. पूर्वेकडे सी.ए.मार्गावर प्रजापती नगर ते ट्रांसपोर्ट नगर या दरम्यान ५. ५ कि.मीपर्यंत मेट्रो मार्गाचा विस्तार केला जाईल.
या मार्गावर पारडी, कापसी खुर्द, ट्रान्सपोर्टनगर ही स्थानके असतील तर पश्चिमेकडे हिंगणा मार्गावर लोकमान्य नगर ते हिंगणा दरम्यान ६.६ कि.मी.पर्यंत विस्तार केला जाईल. त्यावर हिंगणा माऊंट, राजीवनगर, वानाडोंगरी, एपीएमसी, रायपूर, हिंगणा स्थानक व हिंगणा ही स्थानके असतील.
दोन वर्षापूर्वी महामेट्रोने यासंदर्भातील प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. त्याला ८ जानेवारी २०१९ रोजी मंजुरी मिळाली होती. सोमवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी ५ हजार ९७६ कोटी इतकी घसघशीत तरतूद सरकारने केली आहे. यामुळे शहरालगतच्या छोट्या गावांपर्यंत मेट्रोसेवा पोहोचणार आहे.
केंद्राकडून न्याय, राज्याकडून दुर्लक्ष
मेट्रो प्रकल्पाला सुरुवातीपासूनच आर्थिक पाठबळ देणाऱ्या केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात टप्पा दोनसाठी घसघशीत तरतूद करून न्यायच केला आहे. मात्र राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखडा मंजुरीसाठी प्रदीर्घ काळ लावून एकप्रकारे दुर्लक्षच केले होते. शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता टप्पा दोन हा महत्त्वाचा आहे हे येथे उल्लेखनीय.
मेट्रो- २ टप्पा
एकूण लांबी- ४३.८ किमी.
एकूण स्थानके- ३२
जोडणारी गावे- हिंगणा, बुटीबोरी, कामठी, कन्हान, ट्रान्सपोर्टनगर
प्रकल्प किंमत- ६ हजार ७०८