नागपूर : नागपूर महापालिकेच्या अमृत महोत्सवाला सुरूवात झाली आहे. कधीकाळी राजधानीचे शहर असणारे व आता महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरचा गौरवशाली इतिहास आहे. अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या शहराचे महापौरपद भूषवणाऱ्यांची नावे डोळ्याखालून घातल्यास अनेक दिग्गज नावे पुढे येतात. पहिले महापौर होण्याचा मानअर्थतज्ज्ञ, क्रीडाप्रेमी बॅ. शेषराव वानखेडे यांना मिळाला होता. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे पद भूषवले आहे. महापालिका आयुक्तपद भूषवलेले जे.एस सहारिया व मनुकुमार श्रीवास्तव पुढे राज्याचे मुख्यसचिव झाले.

नागपूर महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी हैदराबाद हाऊसमधील सभागृहात करण्यात आले. बोधचिन्हाचे रचनाकार विवेक रानडे यावेळी उपस्थित होते.

नागपूर महापालिकेची स्थापना २ मार्च १९५१ रोजी झाली. महापालिकेच्या अमृत महोत्सव वर्षाला २ मार्च २०२५ पासून सुरुवात झाली आहे. या औचित्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते, बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. महापालिकेच्या सर्व पत्रव्यवहार व मनपाच्या इतर प्रशासकीय कामकाजामध्ये याचा रितसरपणे उपयोग करण्यात येणार आहे. अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महापालिकेने विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या आठवणींनाही यादरम्यान उजाळा देण्यात येणार आहे.

शासनाने १९५१ मध्ये नागपूर मनपाचे प्रशासक म्हणून जी.जी. देसाई यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली जून १९५२ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली आणि बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांना प्रथम महापौर होण्याचा मान मिळाला. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनदा महापौरपद भूषवले आहे. तसेच विद्यमान आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, विकास ठाकरे, संदीप जोशी हे सुद्धा नागपूर महापालिकेचे महापौर व उपमहापौर राहिलेले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत ५४ महापौर, ५६ उपमहापौर आणि ५० आयुक्तांची सेवा नागपूर महापालिकेला लाभली आहे. महाराष्ट्रात नागपूरला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असून नागपूरसाठी आधी सी.एन.सी. ॲक्ट १९४८ अंमलात होता. आता राज्य शासनाच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यात एकच कायदा लागू करण्यात आला आहे. नागपूर महापालिकेमध्ये आयुक्त म्हणून काम करणारे जे.एस. सहारिया आणि मनूकुमार श्रीवास्तव यांना राज्याचे मुख्य सचिव पदावर काम करण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. तसेच इतर आयुक्त म्हणून काम केलेले अधिकारी देखील राज्य शासनात वेगवेगळ्या पदावर काम करीत आहेत.