शहरी भागातील ७६५ मृत्यूंचा समावेश; २४ तासांत ३२ मृत्यू; १,३१३ बाधितांची भर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील शहरी व ग्रामीण भागात गेल्या २४ तासांत नवीन ३२ मृत्यू झाल्याने आजपर्यंतच्या बळींची संख्या एक हजार पार गेली आहे. पैकी ७६५ मृत्यू शहरी भागातील आहेत. तर येथे दिवसभरात नवीन १,३१३ बाधितांची भर पडल्याने आजपर्यंतच्या बाधितांची संख्याही २८ हजार पार गेल्याने सामान्यांमध्ये चिंता वाढली आहे.

गेल्या २४ तासांत दगावलेल्या ३२ रुग्णांमध्ये शहरी भागातील २३, ग्रामीण भागातील ७ आणि जिल्ह्य़ाबाहेरील येथे उपचारासाठी दाखल असलेल्या २ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे येथील आजपर्यंत दगावलेल्या बाधितांची संख्या १ हजार ११ वर पोहचली आहे. त्यात नागपूर महापालिका हद्दीत राहणाऱ्या ७६५ मृत्यू, ग्रामीण भागातील १४९ मृत्यू तर जिल्ह्य़ाबाहेरील येथे उपचार घेणाऱ्या ९७ मृत्यूंचा समावेश आहे. येथील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांत करोना बळी नोंदीचा एक हजारचा टप्पा पार झाल्यावरही आजारावर नियंत्रण मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे  वातावरण आहे.

जिल्ह्य़ातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद ही मेडिकल आणि मेयो रुग्णालयांत झाली आहे. दरम्यान, शहरात नवीन १ हजार ३१३ बाधितांमध्ये शहरी भागातील १ हजार १५६ रुग्ण, ग्रामीणचे १५५ रुग्ण तर जिल्ह्य़ाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत येथील बाधितांची एकूण संख्या तब्बल २८ हजार ३२८ वर पोहचली आहे.

त्यातील सर्वाधिक २१ हजार ८४३ बाधित शहरी भागातील, ६ हजार २०६ रुग्ण ग्रामीण भागातील, २७९ रुग्ण जिल्ह्य़ाबाहेरील येथील रुग्णालयांत उपचाराला आलेले आहेत.

२ हजार बाधित रुग्णालयांत

शहरातील मेडिकल, मेयो, एम्ससह इतर शासकीय व खासगी कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये सध्या २ हजार ८९ बाधितांवर उपचार सुरू आहे. पैकी बहुतांश रुग्णांना ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटरची गरज असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या ११ टँकरचालकांना बाधा

उपराजधानीच्या विविध भागात पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यू कंपनीच्या ७५ टँकरचालकांची करोना चाचणी करण्यात आली. पैकी तब्बल ११ जणांना विषाणूची बाधा असल्याचे पुढे आल्याने अधिकाऱ्यांत खळबळ उडाली. पैकी बहुतांश कर्मचारी लक्षणे नसलेले असून त्यांना विलगीकरणात घेत त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आला आहे. या टँकरच्या माध्यमातून शहरातील झोपडपट्टी परिसराततच जास्त पाण्याचा पुरवठा होत  होता. त्यामुळे झोपडपट्टी परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे, तर ओसीडब्ल्यूने कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेत असून सर्व कार्यालयांत थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटरसह इतर आवश्यक साधने उपलब्ध करत कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जात असल्याचे सांगितले आहे, तर कार्यालयंचे नियमित निर्जंतुकीकरण केले जात असून कुणाला धोका नसल्याचा दावा केला. या घटनेमुळे सुमारे ११ टँकरचे काम थांबवण्यात आले होते. परंतु आता इतर चालकांची व्यवस्था करत पुन्हा सेवा पूर्ववत झाल्याचा ओसीडब्ल्यूचा दावा आहे.

करोनामुक्तांची संख्या १८ हजारावर

शहरी भागात दिवसभरात ९८७ तर ग्रामीण भागात ६७ असे एकूण १ हजार ५४ जन करोनामुक्त झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. त्यामुळे आजपर्यंत येथील करोनामुक्त झालेल्यांची संख्या १८ हजार २१ वर पोहचली आहे. पैकी १३ हजार ४६६ जण शहरी भागातील तर ४ हजार ५५५ जण ग्रामीण भागातील आहेत.

५,८९४ सक्रिय रुग्ण गृहविलगीकरणात

येथील शहरी भागात ७ हजार १५५ तर ग्रामीण भागात २ हजार १४१ असे एकूण ९ हजार २९६ सक्रिय रुग्ण आहे. तर रविवारी दुपारी १ हजार ३१३ नवीन बाधितांपर्यंत प्रशासन पोहचण्याचा प्रयत्न करत होती. एकूण सक्रिय रुग्णांपैकी तब्बल ५ हजार ८९४ जणांवर गृहविलगीकरणातच उपचार सुरू होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur number of corona victims exceeded one thousand abn
First published on: 31-08-2020 at 00:28 IST