Marbat Festival Focus Issues Terrorism Inflation Corruption : नागपूर : उपराजधानीतील ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या शेकडो वर्ष जुन्या मारबत महोत्सवाची नागपूरकरच नाही, तर सारेच वाट बघत असतात. नागपूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या काळ्या आणि पिवळ्या मारबतीचा उत्सव म्हणजे नागपूरकरांसाठी पर्वणीच असते. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी समाजातील कुप्रथा आणि रोग दूर करण्यासाठी शहरात मारबत मिरवणूक काढली जाते. उपराजधानीतच हा उत्सव साजरा केला जात असल्याने या उत्सवाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
तान्ह्या पोळ्याच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो आणि यादिवशी ‘मारबत’ मिरवणूक काढली जाते. मारबत उत्सव हा नागपूरचा ऐतिहासिक वारसा आहे. देशात ब्रिटिश राजवटीत ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी पुण्यात गणेशोत्सव सुरू केला, त्याचा आधीपासूनच नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात झाली. ऐतिहासिक वारसा असलेल्या या उत्सवात काळ्या-पिवळ्या मारबतचे राज्य आहे. त्यांच्या दर्शनासाठी नागपूरच नव्हे तर राज्याच्या इतर भागातूनही लोक येतात. तान्हा पोळ्याच्या दिवशी ‘मारबत आणि बडग्या’ या प्रकारची मिरवणूक जगात फक्त नागपूर, महाराष्ट्रात काढली जाते. ‘घेऊन जा गे.. मारबत’ अशा घोषणा देत ही मिरवणूक काढण्यात येते. कोरोना अपवाद वगळता यात कधीच खंड पडला नाही. अगदी प्लेगची साथ (१८९७) आणि दंगे (१९२७) सुरू असतानाही हा उत्सव कुठल्याही अडथळ्याविना पार पडल्या गेला होता.
मारबतीची आख्यायिका काय…
देशातील इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात विदर्भातील तर्हेणे तेली समाजाचा मोठा सहभाग होता. इंग्रजांच्या राजवटीत लोक अत्याचार सहन करत होते. त्यावेळी देश स्वतंत्र झाला पाहिजे या भावनेतून १८८५ मध्ये तराणे तेली समाजाच्या लोकांनी जागनाथ परिसरात पिवळी मारबत उत्सव समितीची स्थापना केली. इंग्रजांच्या अत्याचाराला कंटाळून लोकांनी त्यांच्या दडपशाही आणि अत्याचाराविरुद्ध पिवळी चळवळ सुरू केली. काळ्या मारबतीची सुरूवात १८८० मध्ये, तर पिवळ्या मारबतीची सुरूवात १८८४ मध्ये झाली होती.
मारबत उत्सवाचा उद्देश काय…
मारबत उत्सव हा गणेशोत्सवापेक्षा जुना सण म्हणून पाहिला जातो. प्राचीन काळी अनेक प्रथा होत्या. त्या पारंपारिक परंपरा मानवजातीसाठी घातक असल्याने त्या नष्ट करण्यासाठीही हा सण साजरा केला जातो. मारबत सण साजरा करण्यामागे एक उद्देश आहे. म्हणजे वाईट परंपरा आणि अंधश्रद्धा जाळून चांगल्या परंपरा आणि कल्पनांचे स्वागत करणे आहे.