नागपूर : राज्यात वर्षाच्या सुरुवातीलाच सातत्याने होणाऱ्या वाघांच्या मृत्यूने धडकी भरवली होती. त्यामुळे दोन महिन्यातच वाघांच्या मृत्यूची पन्नाशी गाठणार का अशी भीती होती. फेब्रुवारीच्या मध्यान्हनंतर हा आलेख खाली आला. पण आता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरील आकडेवारी पाहिली तर पुन्हा एकदा धडकी भरवणारा आकडाच समोर आला आहे. देशात अवघ्या सहा महिन्यात वाघांच्या मृत्यूने शंभरी ओलांडली आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ मृत्यू आहेत.
कर्नाटकात काय घडले..
कर्नाटकातील नर महाडेश्वरा व्याघ्रप्रकल्पात गेल्या आठवड्यात एका वाघिणीसह तिचे पाच बछडे मृतावस्थेत आढळले. एकाच दिवशी झालेल्या पाच वाघांच्या मृत्यूने देशभरातच खळबळ उडाली. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांची विष देऊन शिकार करण्यात आली होती.
मृत्यूचा आकडा अधिक..
या मृत्यूनंतर देशभरात अवघ्या सहा महिन्यात १०३ वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. महाराष्ट्रात सर्वाधिक २९ मृत्यूची नोंद राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर करण्यात आली असली तरी यात बचाव केंद्र, प्राणिसंग्रहालयात काही मृत्यूची नोंद नाही. त्यामुळे हा आकडा आणखी जास्त असू शकतो, असे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.
अभ्यासकांना कशाची भीती..
महाराष्ट्रापाठोपाठ मध्यप्रदेशात देखील २६ वाघांच्या मृत्यूची नोंद राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर आहे. २०२३ मध्ये भारतात सर्वाधिक १८२ मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे २०२५ ची आकडेवारी पाहता आणि वाघांच्या मृत्यूच्या समोर येणाऱ्या घटना पाहता, २०२५ च्या अखेरपर्यंत वाघांच्या मृत्यूची आकडेवारी यापेक्षाही अधिक तर असणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंतचे वाघांचे मृत्यू..
देशात २०२१ या वर्षात १२९ वाघांचा मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये १२२ वाघ मृत्युमुखी पडले. २०२३ मध्ये सर्वाधिक १८२ वाघांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये १२६ वाघ मृत्युमुखी पडले. ते आता २०२५ मध्ये सहा महिन्यात १०३ वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वाघांच्या मृत्यूची कारणे..
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात १ जानेवारी ते २९ जून २०२५ या सहा महिन्यांत विविध कारणांमुळे १०३ वाघांचे मृत्यू झाले आहेत. वाघांची अधिवासासाठी आपापसात होणारी लढाई, अपघात, शिकार आणि नैसर्गिक अशी विविध कारणे त्यामागे आहेत. मात्र, नैसर्गिक कमी आणि संशयास्पद मृत्यूची संख्या अधिक आहे.